यांत्रिकीकरणाने मंदावली बैलांची पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:57 PM2019-08-29T23:57:35+5:302019-08-29T23:58:37+5:30

ग्रामीण भागात आजही बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सकाळी बैलांना धुवून, शिंगांना रंगी-बेरंगी बेगड लावले जातात. झुल पांघरली जाते. सोने जपावे तसा जपून ठेवलेला साज, म्हणजे शिंगोट्या, गळाकंठी, हार बैलावर चढवून वाजत गाजत बैलांना गावातील महादेव मंदिराच्या ठिकाणी नेल्या जाते.

The mechanization has led to the slowdown of bulls | यांत्रिकीकरणाने मंदावली बैलांची पावले

यांत्रिकीकरणाने मंदावली बैलांची पावले

Next
ठळक मुद्देपोळ्याचा उत्साह कायम : कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलांना अतिथीचा बहुमान

प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : वर्षभर आपल्या पाठीवर आसूड झेलून मातीत राबणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी बळीराजा पुरणपोळीचा नवैद्य देऊन बैलाचा सन्मान करतात. पोळ्याच्या दिवशी बैलाचा मान ‘अतिथी देवो भव’ सारखा असतो. ग्रामीण भागात ही परंपरा आजही जपली जात असली तरी अलिकडे शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे बैलांची पावलेच मंदावल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागात आजही बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सकाळी बैलांना धुवून, शिंगांना रंगी-बेरंगी बेगड लावले जातात. झुल पांघरली जाते. सोने जपावे तसा जपून ठेवलेला साज, म्हणजे शिंगोट्या, गळाकंठी, हार बैलावर चढवून वाजत गाजत बैलांना गावातील महादेव मंदिराच्या ठिकाणी नेल्या जाते. त्याच ठिकाणी बैलाचा पोळा भरविला जातो. शंकराच्या मंदिरात बैलजोडी आली की, ‘चाकचाडा बैलगाडा, बैल गेला पवनगडा, पवन गडाहून आणली माती, थे दिली गुरूच्या हाती, एक नमन गौरा पार्वती हरबोला... हरहर महादेव..!’ अशा प्रकारच्या झडत्या म्हणून गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या हाताने तोरण तोडून बैलपोळा फोडतात.
शिवमंदिराला जोडीमालक बैलासह प्रदक्षिणा घालून बैलजोडी आपल्या घरी नेतो. त्यानंतर घरमालकीन बैलजोडीचे पाय धुवून बैलाला आरतीने ओवाळत असते. त्यानंतर बैलजोडीला पुरणपोळीचे जेवन दिले जाते. बैलजोडीसोबत पुरणपोळीचा आस्वाद घेऊन बैलाचे आभार माणले जाते. पोळ्याच्या दिवशीचा हा ग्रामीण साज यांत्रिकीकरणाच्या काळात हरविला आहे. यांत्रिकी युगात ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजात शेतातील बैलाचे पावले मंदावली आहे. कसायाच्या पाशात पशुधन जात असल्याने दिवसेंदिवस गोधन कमी होत आहे. तरीही ग्रामीण भागातील बैल पोळ्याचा हा साज बºयाच लोकांनी अगदी त्याच प्रेमाने जपला आहे. त्यामुळे आजही पोळ्याच्या झडत्या त्याच जोशात गुंजत आहेत.
‘वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी, शेतकरी लढे जन्मभर रास्त भावासाठी, एक नमन गौरा महादेव...’
विद्यमान परिस्थितीवर रंगणाऱ्या या झडत्यांना शेतकरी-शेतमजूर चांगलीच दाद देतात. त्यातून एक प्रकारे शेतकऱ्यांच्या मनातील भावनाही व्यक्त होताना दिसतात. परंतू ट्रॅक्टरची संख्या जसजसी वाढत आहे तसतशी बैलांची संख्याही घटत आहे.

Web Title: The mechanization has led to the slowdown of bulls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी