Lok Sabha Election 2019 Re-polling to be held in 4 centres of Gadchiroli- Chimur constituency of Maharashtra | Lok Sabha Election 2019 : गडचिरोलीतील चार मतदान केंद्रांवर आज फेरमतदान
Lok Sabha Election 2019 : गडचिरोलीतील चार मतदान केंद्रांवर आज फेरमतदान

ठळक मुद्देगडचिरोलीतील चार मतदान केंद्रांवर सोमवारी (15 एप्रिल) फेरमतदान घेण्यात येत आहे. नक्षली कारवायांमुळे मतदान होऊ न शकल्याने हे फेरमतदान घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.एटापल्ली तालुक्यातील  चार मतदान केंद्रावर हे फेरमतदान घेण्यात येत असून चारही मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गडचिरोली - गडचिरोलीतील चार मतदान केंद्रांवर सोमवारी (15 एप्रिल) फेरमतदान घेण्यात येत आहे. नक्षली कारवायांमुळे मतदान होऊ न शकल्याने हे फेरमतदान घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. एटापल्ली तालुक्यातील चार मतदान केंद्रावर हे फेरमतदान घेण्यात येत असून चारही मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी, वांगेतुरी गावात फेरमतदान घेण्यात येत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. 

विदर्भात 11 एप्रिल रोजी 7 लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात मतदान झाले. या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक 72.02 टक्के मतदान गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात झाले. गडचिरोली जिल्ह्यातील 935 मतदान केंद्रांवर गुरूवारी नवमतदारांसह वृद्ध व दिव्यांगांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे नक्षल दहशत असूनही मतदार संघाची मतदानाची टक्केवारी 65 पेक्षा जास्त झाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत या लोकसभा क्षेत्रात 69.88 टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत ही टक्केवारी कमी आहे. दरम्यान मतदानात अडथळे आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी दोन दिवसात तीन भूसुरूंग स्फोट घडविण्यासोबतच गुरूवारी पोलिसांवर फायरिंगही केली. या घटनांमध्ये दोन जवान जखमी झाले आहेत.


एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी या दक्षिणेकडील चार तालुक्यांसह गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कोरची, कुरखेडा या तालुक्यांतही नक्षलवाद्यांचे सावट आहे. नक्षलवाद्यांचा मतदान प्रक्रियेला विरोध असतो. तरीही त्या भागात मतदानाचे प्रमाण वाढले असल्यामुळे नागरिकांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास दृढ होत असल्याचे दिसून येते. यावेळी मतदानाबाबत जनजागृती करण्यातही प्रशासनाने कसर सोडली नाही. त्याचाही सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. या निवडणुकीत भाजपाचे अशोक नेते, काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे, बसपाचे हरिचंद्र मंगाम आणि आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे देवराव नन्नावरे या पाच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त झाले. येत्या 23 मे रोजी एकाच वेळी सर्व ठिकाणची मतमोजणी होणार आहे. 

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केला मतदान केंद्राजवळ स्फोट

गडचिरोली जिल्ह्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसनसूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाघेझरी येथील मतदान केंद्रावर गुरुवारी नक्षल्यांनी भुसुरुंगाचा स्फोट केला होता. केंद्रावर मतदान सुरू असताना अचानक हा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने येथे उपस्थित मतदार व पोलीस जवानांत एकच खळबळ उडाली. स्फोटाच्या ठिकाणापासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर मतदान केंद्र आहे. या स्फोटामुळे जवळपासच्या मतदान केंद्रांना तातडीने अन्यत्र हलविण्यात आले. या सर्व प्रक्रियेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला आहे. काल गट्टा गावात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात दोन जवान जखमी झाले होते.

 


Web Title: Lok Sabha Election 2019 Re-polling to be held in 4 centres of Gadchiroli- Chimur constituency of Maharashtra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.