A life-threatening journey through a rocky road | खड्डेमय मार्गावरून जीवघेणा प्रवास
खड्डेमय मार्गावरून जीवघेणा प्रवास

ठळक मुद्देकोरची-कुरखेडा मार्गाची प्रचंड दुरवस्था : अवजड वाहनांमुळे अपघाताला आमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरची तालुका हा गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील तालुका आहे. महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यासोबतच छत्तीसगडला सुद्धा हा तालुका जोडला आहे. कोरची तालुका मुख्यालयापासून छत्तीसगडचे अंतर केवळ १२ किमी आहे. त्यामुळे कोरची-कुरखेडा या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र सदर मार्गावरील डांबरीकरण उखडून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या मार्गावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनधारकांना खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे सदर मार्गावर आजवर अनेक दुचाकीस्वारांना किरकोळ अपघात घडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनावरील तोल जाऊन प्रवास जिवावर बेतू शकते. मात्र दुर्दशा झालेल्या या मार्गाच्या पक्क्या दुरूस्तीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने अवजड व चारचाकी वाहनाची नेहमी वर्दळ असते. सदर मार्गावरील खड्ड्यांची संख्याही वाढली आहे.
कोरची तालुका व गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून दरवर्षी विविध योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होत असतो. मात्र शासनाकडून प्राप्त झालेल्या निधी खर्चाचे योग्य नियोजन होत नसल्याने विकास कामांना बट्ट्याबोळ झाला आहे. विद्यमान शासन व प्रशासनाचे आदिवासीबहुल, दुर्गम कोरची तालुक्यातील रस्ता विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. सदर रस्त्याच्या पक्क्या दुरूस्तीची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेक नागरिकांनी बऱ्याचदा केली. मात्र लोकप्रतिनिधींसह साऱ्यांचेच रस्ता विकासाकडे कायम दुर्लक्ष होत आहे.
जीव गेल्यावर दुरूस्ती होणार काय?
कोरची-कुरखेडा या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून हा मार्ग पूर्णत: खराब झाला आहे. वारंवार मागणी करूनही शासन व प्रशासनाच्या वतीने सदर मार्गाची पक्की दुरूस्ती अद्यापही करण्यात आली नाही. सदर मार्गावरील अपघातात एखाद्याचा जीव गेल्यावर या मार्गाची दुरूस्ती होणार काय? सदर खड्ड्यात वाहन जाऊन बळी गेल्यावर मार्गाची दुरूस्ती करणार काय, असा सवाल काँग्रेसचे कोरची येथील जिल्हा महासचिव मनोज अग्रवाल यांनी केला आहे. सदर मार्गाची लवकरात लवकर दुरूस्ती न केल्यास काँग्रेस कमिटी कोरचीच्या वतीने आंदोलन उभारणार, असा इशारा अग्रवाल यांनी दिला आहे. सरपंच संघटनेनेही प्रशासनाला निवेदन देऊन रस्ता दुरूस्तीची मागणी अनेकदा केली आहे.


Web Title: A life-threatening journey through a rocky road
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.