कोरोनामुळे किडनीचे नुकसान, लक्षणांकडे दुर्लक्ष नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 05:00 AM2021-06-16T05:00:00+5:302021-06-16T05:00:18+5:30

शरीरातील अशुद्ध घटक लघवीवाटे बाहेर टाकण्याचे काम किडनी करत असते. कोरोनातून बाहेर येण्यासाठी रुग्णाला दिल्या जाणाऱ्या औषधीमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे किडनीही पूर्ण क्षमतेने काम करत नाही. ज्यांना आधीपासून मधुमेहाचा त्रास आहे किंवा किडनीशी संबंधीत आजार आहे, अशी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यास किडनीचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. 

Kidney damage due to corona, do not ignore the symptoms | कोरोनामुळे किडनीचे नुकसान, लक्षणांकडे दुर्लक्ष नको

कोरोनामुळे किडनीचे नुकसान, लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Next
ठळक मुद्देआधीपासून त्रास असणाऱ्यांना घ्यावी लागणार विशेष काळजी

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांना घाबरवून सोडले. जे या दुसऱ्या लाटेत सापडून बरे झाले, त्यांना तर पुनर्जन्म झाल्याचा भास होत आहे. असे असले तरी त्यापैकी अनेकांना किडनीचा त्रास सुरू झाला आहे. कोरोनाच्या औषधोपचाराचे जे काही दुष्परिणाम समोर येत आहेत, त्यात किडनीवर होणारा परिणाम हासुद्धा एक घातक परिणाम ठरत आहे. त्यामुळे दुर्लक्ष न करता योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.
शरीरातील अशुद्ध घटक लघवीवाटे बाहेर टाकण्याचे काम किडनी करत असते. कोरोनातून बाहेर येण्यासाठी रुग्णाला दिल्या जाणाऱ्या औषधीमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे किडनीही पूर्ण क्षमतेने काम करत नाही. ज्यांना आधीपासून मधुमेहाचा त्रास आहे किंवा किडनीशी संबंधीत आजार आहे, अशी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यास किडनीचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. 
एवढेच नाही, तर ज्यांना पूर्वी किडनीचा कोणाताही त्रास नव्हता, त्यांना हा त्रास सुरू झाल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी अनेकांची अवस्था होत आहे. 
काेराेना नंतर म्युकरमायकाेसिसचे रूग्ण आढळत असले तरी जिल्ह्यात त्यापेक्षाही जास्त रूग्ण किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. ते आता विविध ठिकाणी उपचार घेत आहे.

किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास...
- किडनीचा आजार आधीपासून असणाऱ्या व्यक्तीला कोरोना झाल्यास त्यांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- किडनी व्यवस्थित काम करत आहे की नाही याची चाचणी (किडनी फंक्शन टेस्ट) वेळोवेळी करावी.
- पाणी भरपूर प्रमाणात, म्हणजे वेळोवेळी पीत राहावे. लघवी रोखून न धरता वेळीच लघवीला जावे.
- कोणतीही औषधी थेट आपल्या मनाने न घेता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

स्टेरॉईड घेताय, डॉक्टरांना विचारले का?
- कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर किंवा कोरोनासदृश लक्षणे दिसत असल्यानंतर मनाने औषधी घेणे धोक्याचे आहे.
- कोरोनाच्या उपचारात स्टेरॉईड दिले जाते, पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य मात्रेनेच घेणे गरजेचे असते.
- स्टेरॉईडने मधुमेह वाढू शकतो आणि मधुमेहामुळे किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे सावधानता गरजेची आहे.
- स्टेरॉईड घेणे बंद करताना त्याचा डोस हळूहळू कमी करावा लागतो. अन्यथा त्याचे दुष्परिणाम दिसतात.

हे करा...

- दिवसातून अनेक वेळा पाणी पीत राहा. त्यामुळे शुद्धीकरण प्रक्रिया चांगली राहते.
- आंबट पदार्थ जास्त खा, त्यामुळे व्हिटॅमिन सी मिळून इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
- नियमित व्यायाम, फिरणे आणि पुरेशी झोप घ्या. सतत एका ठिकाणी बसून राहू नका.

हे करू नका...

- ज्या औषधांनी किडनीवर परिणाम होतो ती औषधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.
- किडनी आणि मधुमेह हे आजार एकमेकांना पूरक असल्याने दोन्हीकडे दुर्लक्ष करू नका.
- किडनीच्या आजारग्रस्तांनी हिरव्या पालेभाज्या, मांसाहार असे प्रोटीनयुक्त अन्न टाळावे.

नेफ्रॉलॉजिस्टच नाही
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून किडनी विकार तज्ज्ञच (नेफ्रॉलॉजीस्ट) नाही. हे पद रिक्त असल्यामुळे कोरोनाकाळात केल्या जात असलेल्या औषधोपचाराचा किडनीवर काय परिणाम होत आहे, याची तपासणी करणे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी कठीण काम बनले आहे.

 

Web Title: Kidney damage due to corona, do not ignore the symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.