पुरातन हेमाडपंथी मंदिरांच्या पडझडीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 06:00 AM2020-03-08T06:00:00+5:302020-03-08T06:00:33+5:30

तत्कालीन राजा बल्लाळशहाने हिऱ्यांच्या खाणीच्या संरक्षणार्थ वैरागडचा किल्ला बांधला. त्यांच्या मोठ्या भावाची पत्नी हिराईदेवीने पतीच्या स्मरणार्थ भंडारेश्वर मंदिर बांधला, अशी इतिहासात नोंद आहे. या दोन्ही वास्तूंची देखभाल पुरातत्व विभाग करीत आहे. किल्ला व भंडारेश्वर मंदिराच्या सौंदर्यीकरणाचे काम मागील पाच वर्षांपासून सुरू आहे.

Ignoring the fall of ancient Hemadpanthi temples | पुरातन हेमाडपंथी मंदिरांच्या पडझडीकडे दुर्लक्ष

पुरातन हेमाडपंथी मंदिरांच्या पडझडीकडे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देवैरागड परिसरातील स्थिती । पुरातत्त्व विभागाने लक्ष द्यावे

प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : जुन्या कलाकृतींची साक्ष देणारे पाच हेमाडपंथी मंदिरे, ऐतिहासिक वैरागडचा किल्ला व भंडारेश्वर मंदिर, गोरजाई मंदिर अशा अनेक वास्तू वैरागड परिसरात आहेत. सदर वास्तू पुरातन सुवर्णमयी इतिहासाची साक्ष देणाऱ्या आहेत. काळ्याच्या ओघात या वास्तूंची पडझड होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र हा मौल्यवान वारसा जपण्याकडे पुरातत्व विभाग व स्थानिक प्रशासन प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येत आहे.
तत्कालीन राजा बल्लाळशहाने हिऱ्यांच्या खाणीच्या संरक्षणार्थ वैरागडचा किल्ला बांधला. त्यांच्या मोठ्या भावाची पत्नी हिराईदेवीने पतीच्या स्मरणार्थ भंडारेश्वर मंदिर बांधला, अशी इतिहासात नोंद आहे. या दोन्ही वास्तूंची देखभाल पुरातत्व विभाग करीत आहे. किल्ला व भंडारेश्वर मंदिराच्या सौंदर्यीकरणाचे काम मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. वैरागड येथील गोरजाई मंदिर माना समाजाचे दैवत आहे. सदर मंदिर नागवंशीय जमातीच्या राजाने बांधला. या मंदिराच्या सभामंडपाची आता पडझड झाली आहे. एकूण पाच हेमाडपंथी मंदिरांपैकी दोन मंदिरांची तर प्रचंड प्रमाणात पडझड झाली आहे. जुन्या पोस्ट आॅफीसजवळील शिवमंदिराचे गावातील नागरिकांनी जीर्णोध्दार केले. त्यामुळे या शिवमंदिराची स्थिती चांगली आहे.
करपडा बायपास मार्गाच्या बाजुला आदिशक्ती माता मंदिराजवळ दोन हेमाडपंथी मंदिरे आहेत. काही भाविकांनी या मंदिरांची डागडुजी केली. त्यामुळे सदर मंदिरे तग धरून आहेत. मात्र मेंढा, वडेगावकडे जाणाºया रस्त्याकडे हटकर यांच्या वाडीत एक हेमाडपंथी मंदिर आहे. सदर हेमाडपंथी मंदिर शेवटच्या घटका मोजत आहे. तलावाच्या पाळीवरील हेमाडपंथी मंदिर मातीमोल झाला आहे. सदर मंदिरे पुरातन सुवर्णमय कालावधीची साक्ष करून देतात. मानवाला जगणे व संघर्ष करण्यासााठी प्रेरणा देतात. वैरागडसारख्या ग्रामीण भागाला हेमाडपंथी मंदिराचा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासणे आवश्यक आहे. तेव्हाच आपल्या पुढच्या पिढ्यांना पूर्वजांच्या कार्याची साक्ष देऊ शकू. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करून या मंदिरांची डागडुजी करण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Ignoring the fall of ancient Hemadpanthi temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fortगड