गडचिरोलीकरांचा नक्षल्यांविरोधात ‘हुंकार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 06:00 AM2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:00:38+5:30

उद्योगविरहित जिल्हा अशी या जिल्ह्याची असलेली ओळख पुसून टाकत असताना पर्यटन क्षेत्रात कमलापूर हत्ती कॅम्पचेही नाव राज्यात पोहोचले. त्यातून पर्यटक वाढून रोजगार निर्मिती होत असताना नक्षलवाद्यांना हे पहावले नाही. आदिवासी बांधवांच्या रोजगारावर घाला घालण्यासाठी त्यांनी कमलापूर हत्ती कॅम्पची नासधूस करण्याचा प्रकार सोमवारी घडली. त्याचाही रॅलीत सहभागी नागरिकांनी निषेध केला.

Gadchiroli's 'Push' against Naxals | गडचिरोलीकरांचा नक्षल्यांविरोधात ‘हुंकार’

गडचिरोलीकरांचा नक्षल्यांविरोधात ‘हुंकार’

Next
ठळक मुद्देभव्य रॅलीतून निषेध : तीन हजार विद्यार्थ्यांसह नागरिकांनी घेतली नक्षलविरोधी प्रतिज्ञा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलवाद्यांनी पीएलजीए सप्ताह पाळण्याचे आवाहन करत पाच दिवसात अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासह इतर दोन नागरिकांची हत्या केली. यापूर्वीही निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. नक्षलवाद्यांनी घातलेल्या या धुमाकुळाचा गडचिरोली शहरात मंगळवारी भव्य हुंकार रॅली काढून निषेध करण्यात आला. यात मोठ्या संख्येने शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले. गडचिरोलीसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा पद्धतीची हुंकार रॅली काढण्यात आली.
नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्यांचा निषेध करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या नेतृत्वात गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातून हुंकार रॅलीला सुरूवात करण्यात आली. ही रॅली पोटेगाव मार्गावरील जिल्हा क्रीडा संकुलापर्यंत नेण्यात आली. विद्यार्थ्यांनी नारेबाजी करत निषेधाचे विविध फलक हाती घेतले होते.
रॅलीचा समारोप क्रीडा संकुलात करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मार्गदर्शन करताना जिल्ह्याच्या विकासात नक्षलवादी हेच खऱ्या अर्थाने आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
उद्योगविरहित जिल्हा अशी या जिल्ह्याची असलेली ओळख पुसून टाकत असताना पर्यटन क्षेत्रात कमलापूर हत्ती कॅम्पचेही नाव राज्यात पोहोचले. त्यातून पर्यटक वाढून रोजगार निर्मिती होत असताना नक्षलवाद्यांना हे पहावले नाही. आदिवासी बांधवांच्या रोजगारावर घाला घालण्यासाठी त्यांनी कमलापूर हत्ती कॅम्पची नासधूस करण्याचा प्रकार सोमवारी घडली. त्याचाही रॅलीत सहभागी नागरिकांनी निषेध केला.
यावेळी ५०० शालेय विद्यार्थिनींनी मानवी साखळी तयार करीत जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांची प्रतिमा मानवी साखळीतून तयार करून अहिंसेचा संदेश दिला.

नक्षल बंदमुळे एसटीच्या ३६ फेऱ्या प्रभावित
नक्षलबंद दरम्यान जाळपोळीच्या घटना नक्षल्यांकडून घडवून आणल्या जातात. त्यामुळे नक्षल बंदच्या कालावधीत दुर्गम भागातील बसफेऱ्या बंद ठेवल्या जातात. गडचिरोली आगारातील दरदिवशी सुमारे ३६ बसफेऱ्या प्रभावित झाल्या आहेत. यातील काही बसफेºया पूर्णपणे बंद केल्या आहेत. तर काही बसफेऱ्या अशंत: प्रभावित झाल्या आहेत.
गडचिरोली आगारातून सिरोंचावरून आसरअल्लीला जाणारी बसफेरी सिरोंचापर्यंत नेली जाणार आहे. लाहेरी बस आलापल्लीवरून परत आणली जात आहे. पांखादूरकडे जाणारी बस पेंढरीपर्यंत सोडली जात आहे. कोरची तालुक्यातील कोटगूलकडे जाणारी बस कुरखेडापर्यंत नेली जात आहे. चामोर्शी तालुक्यातील ढेकणी बस मुरमुरीपर्यंत पाठविली आहे. गडचिरोली-मुलचेरा बस घोटपर्यंत, मिचगाव बस धानोरापर्यंत, विकासपल्ली बस घोटपर्यंत, रांगी, मोहल्ली या बसफेऱ्या बेलगावपर्यंत, कसनसूर पेंढरीपर्यंत, जल्लेर बसफेरी पोटेगावपर्यंत आदी ३६ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या बसफेऱ्या ८ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. बसफेऱ्या बंद असल्यामुळे त्या मार्गावरील प्रवाशांचे हाल होत आहेत.

Web Title: Gadchiroli's 'Push' against Naxals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.