‘त्या’ आरोपींना एकदा माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 06:00 AM2019-08-31T06:00:00+5:302019-08-31T06:00:27+5:30

गेल्या १ मे रोजी कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडविला होता. त्यात १५ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. या प्रकरणात नक्षलवाद्यांना सहकार्य केल्याप्रकरणी लवारी गावातील ६ युवकांना पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून ते युवक न्यायालयीन कोठडीत आहेत.

Forgive those 'accused' once | ‘त्या’ आरोपींना एकदा माफ करा

‘त्या’ आरोपींना एकदा माफ करा

Next
ठळक मुद्देलवारीवासीयांची गळ : जांभुळखेडा भूसुरूंग प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चार महिन्यांपूर्वीच्या जांभुळखेडा भूसुरूंग स्फोट प्रकरणात अटकेत असलेल्या लवारी गावातील ६ आरोपींनी नक्षलवाद्यांना साथ देणे ही त्यांची चूक होती. भूलथापांना बळी पडून गावातील हे लोक त्यांच्या आहारी गेले. पण यापुढे आम्ही गावात नक्षलवाद्यांना पायही ठेवू देणार नाही. मात्र एकदा गावातील त्या युवकांना माफ करा, अशी विनंती लवारीतील ४९ गावकऱ्यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे निवेदनातून केली.
गेल्या १ मे रोजी कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडविला होता. त्यात १५ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. या प्रकरणात नक्षलवाद्यांना सहकार्य केल्याप्रकरणी लवारी गावातील ६ युवकांना पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून ते युवक न्यायालयीन कोठडीत आहेत.
अटकेत असलेल्या युवकांमुळे त्यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. एका युवकाचे शिक्षण अर्धवट राहिले आहे, अशी अनेक कारणे सांगत लवारीतील गावकरी आणि आरोपींच्या कुटुंबियांनी त्यांना एकदा माफी देण्याची गळ घातली. यावेळी त्यांनी नक्षलवाद्यांमुळे लवारी गावातील आदिवासी समाजातील तरुण पिढी बर्बाद होत असल्याचे आणि ते लोक स्वत:च्या फायद्यासाठी आमच्या मुलांचा वापर करत असल्याचे पोलीस अधीक्षकांना सांगितले. मात्र यापुढे असे होऊ देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.
यावेळी पोलीस अधीक्षकांनीही त्यांना नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी पडणाऱ्यांचे किती हाल होतात हे गावकऱ्यांना समजावून सांगितले.
कायदेशिर मार्गाने शक्य ती मदत करणार
आमची लढाई गावकऱ्यांशी नाहीच, पण त्यांनी नक्षलवाद्यांना साथ देऊन आपले जीवन व्यर्थ न घालवता विधायक आणि विकासात्मक काम करणाऱ्यांना साथ द्यावी ही आमची अपेक्षा आहे. त्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. त्यामुळे त्या गंभीर गुन्ह्यासाठी त्यांना कायदेशिर बाबींना तोंड द्यावेच लागेल. पण गावकरी जर आता बोलत असल्याप्रमाणे आपल्या वागणुकीत बदल करून नक्षलवाद्यांना संपूर्ण गावबंदी करणार असतील, पोलिसांना त्यांच्या कामात सहकार्य करणार असतील तर आम्हीही त्यांना कायदेशिर मार्गाने शक्य तेवढी मदत करू, असे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
ग्रामसभेत घेणार नक्षल गावबंदीचा ठराव
नक्षलवाद्यांमुळे गावावर आलेले संकट यापुढे येऊ नये म्हणून गावकरी स्वयंस्फूर्तीने पुढे आले आहेत. लवकरच ग्रामसभा घेऊन नक्षलवाद्यांना आमच्या गावात आम्ही पाय ठेवू देणार नाही. तसेच ‘नक्षल गावबंदीचा’ ठराव ग्रामसभेत घेणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिली. गावाच्या विकासासाठी पोलीस दलाने जनजागरण मेळाव्याचे आयोजन करावे, असे पत्र पुराडा पोलीस स्टेशनला दिले असल्याचेही गावकºयांनी यावेळी सांगितले.

Web Title: Forgive those 'accused' once

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.