पुराच्या पाण्याने भामरागड जलमय, 300 कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलविले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 05:36 PM2019-08-08T17:36:31+5:302019-08-08T17:37:11+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड हे तालुका मुख्यालयाचे गाव पुराच्या पाण्यामुळे जलमय झाले आहे.

flood in Bhamaragad, 300 family's rescued | पुराच्या पाण्याने भामरागड जलमय, 300 कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलविले

पुराच्या पाण्याने भामरागड जलमय, 300 कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलविले

Next

गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड हे तालुका मुख्यालयाचे गाव पुराच्या पाण्यामुळे जलमय झाले आहे. सततच्या पावसामुळे दुथडी भरून वाहात असलेल्या पर्लकोटा नदीला गेल्या 15 दिवसांत तिस:यांदा पूर येऊन पुराचे पाणी भामरागडमध्ये शिरले. बुधवारी सकाळपासून गावाच्या दिशेने पुढे सरकत असलेल्या पुराच्या पाण्याने गुरूवारी सकाळी 150 पेक्षा जास्त घरे व दुकानांना वेढा दिला. याशिवाय 200 कुटुंबियांच्या जाणारा मार्ग पाण्याखाली गेल्याने हाह:कार उडाला आहे. 

आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्परता दाखवत जवळपास 300 कुटुंबियांना उंच भागातील घरे,  तहसील कार्यालयाचे सभागृह आणि गावातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात हलवून गरजेनुसार त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था केली आहे. पाणी कमी होण्याच्या आशेने घरातच थांबून अडकून पडलेल्या अनेक लोकांसह त्यांच्या घरातील साहित्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मोटरबोट व डोंग्याने पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. 

गावातील गरोदर महिलांना आधीच हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात आणि ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याशिवाय भामरागडमध्येही पुरेसा औषधीसाठा असून तालुका आरोग्य अधिका:यासह सर्व चमू गावातच आहे. तहसीलदार कैलास अंडील गडचिरोलीत गेल्यानंतर पूर चढल्याने ते अलिकडेच अडकून पडले आहेत. परंतू सर्व परिस्थितीवर नजर ठेवून ते सर्वाना सूचना करत आहेत. गावात नायब तहसीलदार निखिल सोनवाने, हेमंत कोकोडे तसेच ठाणोदार संदीप बांड व इतर कर्मचारी परिस्थिती हाताळत आहेत.

इंद्रवतीने ओलांडली धोक्याची पातळी
गुरूवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार 24 तासात भामरागडमध्ये 120 मिमी पाऊस झाला आहे. तीन नद्यांच्या संगमावर वसलेल्या भामरागडला यावेळी छत्तीसगडकडून येणा:या इंद्रावती नदीच्या पुरामुळे मोठा फटका बसला आहे. छत्तीसगडमधील जगदलपूर जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीच्या प्रवाहामुळे पर्लकोटा नदीचे पाणी संगमावर अडल्या जाऊन ते पाणी गावात शिरले आहे. 

तालुक्यात सर्व शाळांना सुटी
भामरागडप्रमाणो इतर अनेक गावांचा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाला आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार कैलास अंडील यांनी दिली. नागरिकांच्या मदतीसाठी महसूल विभागासह शिक्षकांची आणि नगर पंचायतच्या कर्मचा:यांचीही मदत घेतली जात आहे. संपर्कासाठी मोबाईल नेटवर्क आणि वीज पुरवठा सुरू राहण्याकडेही प्रशासनाचे कटाक्षाने लक्ष आले. 

सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण इंद्रावती नदीची पाणीपातळी वाढल्यास परिस्थिती बिघडू शकते. गरज पडल्यास एनडीआरएफची टीम बोलविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन घेईल. पोलीस आणि महसूल विभागाकडे असलेल्या सॅटेलाईट फोनने संपर्क ठेवून योग्य त्या सूचना केल्या जात आहेत. पूरग्रस्तांची योग्य ती व्यवस्था करण्यासाठी विविध विभागांचे जवळपास 100 कर्मचारी कार्यरत आहेत.
- कैलास अंडील
तहसीलदार, भामरागड

Web Title: flood in Bhamaragad, 300 family's rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.