पाच हजारांवर घरांची पावसामुळे पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 06:00 AM2019-09-20T06:00:00+5:302019-09-20T06:00:30+5:30

यावर्षी आतापर्यंत पर्लकोटा नदीच्या पुलावर ७ वेळा पाणी चढले. याशिवाय दोन वेळा भामरागड शहरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बहुतांश घरांची पडझड झाली आहे. घरातही पुराचे पाणी घुसल्याने सामानाचे मोठे नुकसान झाले.

Five thousand houses fall due to rain | पाच हजारांवर घरांची पावसामुळे पडझड

पाच हजारांवर घरांची पावसामुळे पडझड

Next
ठळक मुद्दे२१ जण वाहून गेले : सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : यावर्षी जिल्ह्यात पावसाने हाह:कार उडवल्याने सर्वच तालुक्यांत वारंवार अतिवृष्टी झाली. त्यातही अहेरी उपविभागात येणाऱ्या भामरागडसह इतर तालुक्यांमध्ये पावसामुळे बरीच हाणी झाली आहे. नुकसानाचा अंदाज घेणाऱ्या सर्व्हेक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात असून पडझड झालेल्या घरांचा आकडा ५ हजारांच्या घरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे वारंवार नदी व नाल्यांना आलेल्या पुरांमुळे आतापर्यंत २१ जणांना जीव गमवावा लागला. त्यातील ५ जणांचे मृतदेह हाती लागलेले नाहीत.
पावसाळ्याचे अजून १० दिवस शिल्लक असले तरी आतापर्यंत वार्षिक सरासरीपेक्षा बराच जास्त म्हणजे १८२८ मिमी पाऊस बरसला आहे. सर्वाधिक पाऊस भामरागड तालुक्यात झाला. त्यामुळे या तालुक्यात जीवित आणि वित्तहाणीचे प्रमाणही जास्त आहे.
भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदीला येणाऱ्या पुरामुळे तालुका मुख्यालयासह काही गावांचा संपर्क तुटतो. तसेच अनेक गावांमध्ये जाण्यासाठी छोटे नाले ओलांडून जावे लागते. परंतू सततच्या पावसामुळे हे नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने गावकऱ्यांची चांगलीच अडचण झाली. त्या नाल्यातून किंवा त्यावरील ठेंगण्या पुलावरून पैलतीर गाठण्याच्या प्रयत्नात भामरागड तालुक्यात ९ जणांना बळी जावे लागले. त्यातील २ जणांचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.
यावर्षी आतापर्यंत पर्लकोटा नदीच्या पुलावर ७ वेळा पाणी चढले. याशिवाय दोन वेळा भामरागड शहरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बहुतांश घरांची पडझड झाली आहे. घरातही पुराचे पाणी घुसल्याने सामानाचे मोठे नुकसान झाले.
जीवित हाणीत सर्वाधिक ९ जण भामरागड तालुक्यातील, तर ४ जण अहेरी तालुक्यातील आहेत. याशिवाय गडचिरोली व आरमोरी तालुक्यात प्रत्येकी २, तर चामोर्शी, मुलचेरा, कुरखेडा व कोरची तालुक्यात प्रत्येकी एक जण पुरात वाहून गेला. पुराच्या पाण्यात शिरून पलिकडे जाण्याच्या प्रयत्नात हे सर्वजण वाहून गेले.
पूरपरिस्थितीचा फटका मुक्य प्राण्यांनाही बसला. आतापर्यंत ५९४ जवानरांना जीव गमवावा लागला.

मदत वाटपाचे काम होणार आता वेगाने
पावसाने थोडी उसंत घेताच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षणासाठी पाठविलेल्या इतर तालुक्यातील अतिरिक्त मनुष्यबळामुळे भामरागड तालुक्यात नुकसानाचे पंचनामे करण्याचे आव्हानात्मक काम आता पूर्णत्वास जात आहे. त्यामुळे लवकरच त्या सर्व नुकसानग्रस्तांना रोख स्वरूपात मदत वाटपाचे काम सुरू होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी सांगितले.

योग्य व्यवस्थापनामुळे जीवितहानी टळली
वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागडसोबत एटापल्ली, अहेरी, आरमोरी, गडचिरोली व इतरही तालुक्यांमध्ये अनेक जण पुरात अडकून पडले होते. त्या सर्वांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडिल यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी यांनी वेळीच आपल्या पथकांना तिथे पाठवून त्यांचा जीव वाचवला. या अधिकाऱ्यांनी अहोरात्र काम करून कमीत कमी नुकसान होण्यासाठी प्रयत्न करण्यासोबत पूरग्रस्तांना आश्रय देण्यासाठीही धावपळ केली. त्यामुळे संभावित जीवित हाणी टाळण्यात बऱ्याच प्रमाणात यश आले. आता नागरिकांकडून प्राप्त मदत वाटपाचे काम सुरू आहे.

Web Title: Five thousand houses fall due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस