बदलीनंतरही कर्मचारी ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 05:00 AM2020-10-08T05:00:00+5:302020-10-08T05:00:35+5:30

जिल्हा परिषदेअंतर्गत सर्वच पदांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. मात्र यावर्षी कोरोनामुळे या बदल्या जूनपर्यंत लांबल्या. उशिरा का होईना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या पार पडल्या. १० ते १५ वर्षांपासून नक्षलग्रस्त व दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सामान्य क्षेत्रात नोकरी करण्याची तसेच कुटुंबाजवळ राहण्याची संधी उपलब्ध झाली होती. त्यामुळे दुर्गम भागातून बदली झालेले आरोग्य कर्मचारी आनंदी होते.

Employees 'as is' after transfer | बदलीनंतरही कर्मचारी ‘जैसे थे’

बदलीनंतरही कर्मचारी ‘जैसे थे’

Next
ठळक मुद्देतीन महिने उलटले : दुर्गम भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जून महिन्यात ७० आरोग्य सेवक, ९० आरोग्य सेविका आणि १५ आरोग्य सहायिकांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्या होऊन आता तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना भारमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा हिरमोड होत आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत सर्वच पदांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. मात्र यावर्षी कोरोनामुळे या बदल्या जूनपर्यंत लांबल्या. उशिरा का होईना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या पार पडल्या. १० ते १५ वर्षांपासून नक्षलग्रस्त व दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सामान्य क्षेत्रात नोकरी करण्याची तसेच कुटुंबाजवळ राहण्याची संधी उपलब्ध झाली होती. त्यामुळे दुर्गम भागातून बदली झालेले आरोग्य कर्मचारी आनंदी होते. मात्र बदलीला तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भारमुक्त केले नाही. आरोग्य विभागात आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे जोपर्यंत नवीन कर्मचारी रूजू होत नाही, तोपर्यंत कार्यरत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अधिकारी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. कार्यरत कर्मचाऱ्याला भारमुक्त केल्यास दुसरा कर्मचारी रूजू न झाल्यास आरोग्य यंत्रणा कोलमडेल, अशी भीती वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाटत आहे.
सामान्य भागातून दुर्गम भागात बदली झालेले कर्मचारी विविध कारणे सांगून ज्या दुर्गम भागात बदली झाली, त्या ठिकाणी रूजू होण्यास टाळाटाळ करीत आहेत. सामान्य भागातील कर्मचारी दुर्गम भागात रूजू झाले नसल्याने दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया रखडली आहे. सर्वच कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत. मात्र भारमुक्त केले जात नसल्याने दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी खितपत पडून राहावे लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना त्याच भागात सेवा द्यावी लागत आहे.

सामान्य भागातील कर्मचाऱ्यांची मनमानी
कोणत्याही कर्मचाऱ्यांची तर दर तीन वर्षांनी बदली होणे आवश्यक आहे. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांची कधीच तीन वर्षांच्या अंतराने नियमित बदली होत नाही. सामान्य भागात कार्यरत असलेले कर्मचारी, अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आपली बदली दुर्गम भागात होणार नाही, यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात. यात ते यशस्वीही होत असल्याने याचा फटका दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना बसत आहे. काही कर्मचारी १० ते १५ वर्षांपासून दुर्गम भागात सेवा देत आहेत. सामान्य भागातील कर्मचारी मात्र जुगाड लावून दुर्गम भागात बदली टाळत असल्यामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Employees 'as is' after transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.