न.पं.मधील ओबीसींच्या 11 जागांवरील निवडणूक स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 05:00 AM2021-12-08T05:00:00+5:302021-12-08T05:00:39+5:30

जिल्हाधिकाऱ्यांनी नामांकन भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे केली. ही विनंती आयोगाने मान्य केल्याने ७ ऐवजी ८ डिसेंबरला नामांकन भरण्याची शेवटची तारीख राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नामांकनासाठी शेवटचा दिवस असल्याचे गृहीत धरून सर्वच ठिकाणी  मोठी गर्दी झाली होती. मात्र, इंटरनेट आणि मोबाईलची सेवा विस्कळीत होण्याची समस्या मंगळवारीही कायम होती. 

Election of 11 OBC seats in NP has been postponed | न.पं.मधील ओबीसींच्या 11 जागांवरील निवडणूक स्थगित

न.पं.मधील ओबीसींच्या 11 जागांवरील निवडणूक स्थगित

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील ९ नगर पंचायतींच्या निवडणुकीतील ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) आरक्षित जागांवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. जिल्ह्यात ९ पैकी ५ नगर पंचायतींमधील ११ प्रभागांना याचा फटका बसला आहे. ओबीसी आरक्षण वाढविण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केल्यामुळे नगर पंचायतींमधील नामाप्र आरक्षित जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली. 
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या अनेक भागात इंटरनेटची समस्या निर्माण झाल्यामुळे उमेदवारांना नामांकन भरताना आणि निवडणूक यंत्रणेला ऑनलाईन प्रक्रिया करण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नामांकन भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे केली. ही विनंती आयोगाने मान्य केल्याने ७ ऐवजी ८ डिसेंबरला नामांकन भरण्याची शेवटची तारीख राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नामांकनासाठी शेवटचा दिवस असल्याचे गृहीत धरून सर्वच ठिकाणी  मोठी गर्दी झाली होती. मात्र, इंटरनेट आणि मोबाईलची सेवा विस्कळीत होण्याची समस्या मंगळवारीही कायम होती. 

रात्री उशिरापर्यंत सुरू होते काम
ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयात मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंतच नामांकन स्वीकारण्याची मुदत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आवाराच्या आत असलेल्या सर्वांचे नामांकन अर्ज तपासून ते स्वीकारण्याचे आणि त्याची ऑनलाईन माहिती भरण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

...या नगर पंचायतींच्या प्रभागात निवडणुकीला स्थगिती

-    ओबीसी आरक्षण रद्दचा फटका बसलेल्या नगर पंचायतींमध्ये चामोर्शी येथे ४ प्रभाग, सिरोंचा येथे ३, कुरखेडा येथे २, तर अहेरी आणि धानोरा येथे प्रत्येकी एका प्रभागातील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. 

-    उर्वरित नगर पंचायतींमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकही प्रभाग आरक्षित नाही. त्यामुळे त्या ठिकाणी सर्वच प्रभागांमध्ये निवडणूक पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे होणार आहे.

हमीपत्र सादर करण्याची मुभा
राज्य निवडणूक आयोगाने दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमामध्ये नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे कळविले होते. आयोगाच्या ६ डिसेंबरच्या पत्रान्वये आता शासनाने नगर विकास विभागाचा सन २०२१चा अध्यादेश क्रमांक १५, दिनांक ६ डिसेंबर २०२१नुसार नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा आणि निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे हमीपत्र सादर करण्याची मुभा उमेदवारांना दिलेली आहे, असे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी कळविले.
निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, चामोर्शी, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा आणि कोरची या ९ नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त, नागपूर यांनी आयोगाच्या वतीने  अधिकाऱ्यांची मुख्य निवडणूक निरीक्षक व निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यात जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद हे मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतील. तसेच निवडणूक निरीक्षक म्हणून जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, (चामोर्शी, अहेरी व सिरोंचा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मस्तोळी (कोरची, कुरखेडा व धानोरा) आणि चंद्रपूर महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक गराटे (मुलचेरा, एटापल्ली व भामरागड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Web Title: Election of 11 OBC seats in NP has been postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.