Doctor's work in 3 thousand is incomplete | तीन हजारवर घरकुलांचे काम अपूर्ण
तीन हजारवर घरकुलांचे काम अपूर्ण

ठळक मुद्देगती मंदावली : प्रशासकीय यंत्रणेकडून पुरेशी जनजागृती नाही; लाभार्थ्यांचीही उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सन २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तीन वर्षात मिळून एकूण १० हजार १७५ घरकुलांच्या कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली. यापैकी आतापर्यंत ७ हजार १३७ घरकूल पूर्ण करण्यात आलू असून अद्यापही ३ हजार ३८ घरकुलांचे काम अपूर्ण स्थितीत आहे.
सर्वसामान्य गरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी घरकूल बांधकामांना मंजुरी प्रदान करण्यात येते. शिवाय शासनाकडूनच जिल्ह्याला घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट दरवर्षी मिळत असते. २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षाच्या कालावधीत बाराही तालुके मिळून जिल्ह्याला एकूण १० हजार १८७ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी प्रशासनातर्फे १० हजार १७५ घरकूल बांधकामांना मंजुरी प्रदान करण्यात आली. यापैकी आतापर्यंत ७ हजार १३७ घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले. यामध्ये अहेरी तालुक्यात ९२८, आरमोरी ६८३, भामरागड १४०, चामोर्शी ६२१, देसाईगंज ४१०, धानोरा ६४१, एटापल्ली ३२६, गडचिरोली ५८८, कोरची ५९६, कुरखेडा ९७०, मुलचेरा २४६ व सिरोंचा तालुक्यातील ९८८ घरकुलांचा समावेश आहे.
प्रशासनाच्या वतीने घरकूल बांधकामासंदर्भात जनजागृती करण्यात येते. मात्र ही जनजागृती तोकडी पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यात घरकूल बांधकामाची गती मंदावल्याचे दिसून येत आहे. अद्यापही अहेरी तालुक्यात १ हजार १४, आरमोरी तालुक्या ४२, भामरागड तालुक्यात १०६, चामोर्शी तालुक्यात २४२, देसाईगंज ३६, धानोरा १५६, एटापल्ली २२३, गडचिरोली ६९, कोरची ६१, कुरखेडा १५१, मुलचेरा ३९ व सिरोंचा तालुक्यात तब्बल ८९९ घरकूल अपूर्ण स्थितीत आहेत.
घरकूल बांधकामासाठी लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदानाच्या स्वरूपात निधी उपलब्ध होत असते. मात्र यंदा रेती घाटाची लिलाव प्रक्रिया रखडल्याने तीन ते चार महिने रेतीचा तुटवडा निर्माण झाला. याचा परिणाम ग्रामीण भागातील घरकूल बांधकामावर झाला. अनेक घरकूल लाभार्थ्यांनी पहिल्या हप्त्याचे अनुदान मिळाल्यानंतर घरकूल बांधकामास प्रारंभ केला. मात्र आणलेली रेती अल्पावधीतच संपल्याने अनेकांचे घरकूल बांधकाम थाबले. परिणामी पुन्हा रेतीची जुळवणूक करण्यासाठी अनेक लाभार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. घरकूल बांधकामाची गती मंदावण्यासाठी हे प्रमुख कारण असले तरी लाभार्थ्यांची अनास्थाही कारणीभूत आहे. प्रशासनाने जनजागृती व कठोर धोरण अवलंबल्यास गती वाढू शकते.

घरकुल पूर्ण करूनही चौथ्या हप्त्याचे अनुदान मिळेना
सन २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तीन वर्षातील मिळून एकूण ७ हजार १३७ घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र यापैकी ४ हजार ९१७ लाभार्थ्यांना चवथ्या हप्त्याचे शेवटचे अनुदान मिळाले आहे. घरकुलाचे बांधकाम करूनही तब्बल २ हजार २२० लाभार्थ्यांच्या बँक खात्यात घरकुलाच्या अनुदानाच्या चवथ्या हप्त्याची रक्कम वळती करण्यात आली नाही. याला अनेक तांत्रिक बाबी कारणीभूत आहेत. आॅनलाईन सॉफ्टवेअरमध्ये माहिती अपडेट नसणे हे कारण आहे. घरकुलाच्या अनुदानासाठी अनेक लाभार्थी पंचायत समिती कार्यालयात चकरा मारत असल्याचे दिसून येते. घरकूल लाभार्थ्यांना घरकूल बांधकामाच्या टप्प्यानुसार अनुदान अदा केले जाते. घरकूल मंजूर होऊन सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पहिल्या हप्त्याचे अनुदान अदा केले जाते. त्यानंतर लाभार्थी घरकूल बांधकामास प्रारंभ करतात. त्यानंतर टप्प्याटप्याने अनुदान दिले जाते.


Web Title: Doctor's work in 3 thousand is incomplete
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.