कोरोना @ 25

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:59+5:30

राज्यात सर्वाधिक काळ ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या गडचिरोलीत गेल्या सोमवारी (दि.१८) पहिल्यांदा ५ रुग्णांची नोंद झाली. तेव्हापासून रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हे सर्व रुग्ण जिल्ह्यातीलच रहिवासी असले तरी ते मुंबई-पुणे येथे विविध कामकाजावर मजूर म्हणून गेले होते. तेथून एकत्रितपणे येतानाच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे.

Corona 25 | कोरोना @ 25

कोरोना @ 25

Next
ठळक मुद्देएकाच दिवशी १० जणांची भर : दक्षिण भागातील तीन तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १० जणांची भर पडली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २५ वर गेली आहे. या १० जणांमध्ये एटापल्ली तालुक्यातील ९ तर एक जण भामरागड तालुक्याचा असल्याचे समजते. हे रुग्ण मुंबईवरून आलेले असून ते विलगिकरण कक्षात होते. रविवारी रात्री अहेरीतील विलगिकरण कक्षात असलेल्या २ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तीन तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून त्याचा फैलाव रोखण्याचे आव्हान यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे.
राज्यात सर्वाधिक काळ ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या गडचिरोलीत गेल्या सोमवारी (दि.१८) पहिल्यांदा ५ रुग्णांची नोंद झाली. तेव्हापासून रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हे सर्व रुग्ण जिल्ह्यातीलच रहिवासी असले तरी ते मुंबई-पुणे येथे विविध कामकाजावर मजूर म्हणून गेले होते. तेथून एकत्रितपणे येतानाच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे. जिल्ह्यात दाखल होताच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले. सुरूवातीला चामोर्शी, कुरखेडा, आरमोरीनंतर रविवारी अहेरी आणि मंगळवारी एटापल्ली येथील विलगिकरणातील लोक पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे.
आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात आढळलेले सर्व २५ रुग्ण हे मुंबई आणि पुण्यावरून आलेले असले तरी ते ग्रामीण भागातीलच रहिवासी आहेत. ते संस्थात्मक विलगीकरणात असल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी झाली. पण अनेक मजूरवर्ग पायी चालत आल्याने प्रशासनाला माहिती न देता आपल्या घरी पोहोचला आहे. त्यांच्यात जर कोरोना पॉझिटिव्ह असेल तर कोरोना फैलाव पसरण्यापासून कसा रोखणार याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे.
गेल्या आठवडाभरापासून रेड झोनमधून आलेल्या सर्वच लोकांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवले जात आहे. त्यांतील बहुतांश लोकांचे स्वॅब नमुने परीक्षणासाठी घेतले आहेत. अजूनही नमुने घेणे सुरूच आहे. विशेष म्हणजे बाहेरून आलेल्या संशयित प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना ठिकठिकाणच्या विलगिकरण कक्षात आणणे सुरूच आहे. सोमवारी ३९६ लोकांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले.

५१२ जणांचे अहवाल येणे बाकी
जिल्ह्यात १२५९ संभावित रुग्ण आहेत. त्यापैकी ७२२ लोक निरीक्षणाखाली असून २५ जण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत ११६४ लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले. त्यापैकी ६८७ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर २५ पॉझिटिव्ह आले आहेत. अजून ५१३ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी किती लोक पॉझिटिव्ह आहेत आणि किती निगेटिव्ह यावर जिल्ह्यात किती प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला हे स्पष्ट होणार आहे.

एटापल्लीत ९ रुग्णांमुळे खळबळ
एटापल्ली : येथील शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशा तीन ठिकाणी विलगीकरण कक्ष आहेत. या तिन्ही विलगीकरण कक्षात ७० पुरूष व २१ महिला आहेत. विलगिकरण कक्षात असलेले बहुतांश नागरिक पुणे, मुंबई, औरंगाबाद व इतर राज्यातील रेडझोनमधून आली आहेत. २२ मे रोजी ४० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एकाच दिवशी नऊ नमुने पॉझिटीव्ह आल्याने एटापल्ली येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एटापल्लीतील ९ आणि भामरागडचा १ असे १० जण येथे होते. त्यात ७ पुरूष आणि ३ महिला आहेत.

Web Title: Corona 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.