पर्यवेक्षक उशिरा पोहोचल्याने शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 06:00 AM2020-02-17T06:00:00+5:302020-02-17T06:00:32+5:30

शिष्यवृत्तीचा पहिला पेपर सकाळी ११ ते १२.३० या वेळेत ठेवण्यात आला होता. पाचव्या वर्गाचे विद्यार्थी पहिल्यांदाच वस्तुनिष्ठ प्रकारची परीक्षा देत असल्याने त्यांना रोल नंबर, नाव व इतर बाबी लिहिताना अडचण होऊ शकते. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना १०.३० वाजताच ओएमआर शीट देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्याकडून योग्य ती माहिती भरून घेणे आवश्यक होते.

Confusion during the scholarship exam as the supervisor arrives late | पर्यवेक्षक उशिरा पोहोचल्याने शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान गोंधळ

पर्यवेक्षक उशिरा पोहोचल्याने शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान गोंधळ

googlenewsNext
ठळक मुद्देविद्याभारती हायस्कूलमधील प्रकार : काही शिक्षकांनी मारली दांडी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक विद्याभारती हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केलेले शिक्षक उशीरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा पेपर उशिरा देण्यात आला. परीक्षेदरम्यान निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
शिष्यवृत्तीचा पहिला पेपर सकाळी ११ ते १२.३० या वेळेत ठेवण्यात आला होता. पाचव्या वर्गाचे विद्यार्थी पहिल्यांदाच वस्तुनिष्ठ प्रकारची परीक्षा देत असल्याने त्यांना रोल नंबर, नाव व इतर बाबी लिहिताना अडचण होऊ शकते. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना १०.३० वाजताच ओएमआर शीट देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्याकडून योग्य ती माहिती भरून घेणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांना पेपर देण्यापूर्वी संबंधित पर्यवेक्षकाला केंद्र संचालकांकडून पेपर घेणे, पेपर व्यवस्थित आहे की नाही याबाबी तपासणे आवश्यक असते. त्यामुळे संबंधित पर्यवेक्षकांनी किमान १० वाजता परीक्षा केंद्रावर हजर होणे आवश्यक होते. मात्र यातील बहुतांश पर्यवेक्षक १०.३० वाजताच्या नंतर पोहोचले. त्यामुळे विद्यार्थ्यांना १०.५० वाजता उत्तरपत्रीका देण्यात आली. या १० मिनिटाच्या कालावधीत त्यांच्याकडून उत्तरपत्रीकेवर आवश्यक ती माहिती भरून घेण्यात आली. घाईमध्ये काही विद्यार्थ्यांनी चुकीची माहिती भरली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, परीक्षा हा अतिशय संवेदनशील मुद्दा असतानाही नियुक्त केलेले पर्यवेक्षक उशीरा पोहोचणे हा अतिशय गंभीर प्रकार आहे. विशेष म्हणजे, ज्या पर्यवेक्षक शिक्षकांना नेमणूक देण्यात आली होती. त्यातील जवळपास पाच शिक्षक आलेच नाही. त्यामुळे वेळेवर स्थानिक विद्याभारती हायस्कूलमधील शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून नेमावे लागले. अशा दांडीबहाद्दर तसेच उशीरा आलेल्या शिक्षकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

सकाळच्या सत्रात दिला दुपारचा पेपर
उशीरा परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या शिक्षकांना आपण कोणती प्रश्नपत्रीका देत आहोत, हे सुध्दा माहित नव्हते. घाईमध्ये काही पर्यवेक्षकांनी पहिल्या सत्राच्या प्रश्नपत्रीकेऐवजी दुसऱ्या सत्राची प्रश्नपत्रीका दिली. काही विद्यार्थ्यांनी याबाबत आक्षेप घेतल्यानंतर शिक्षकांच्या सदर बाब लक्षात आली. त्यानंतर पुन्हा पेपर परत मागून त्यांना पहिल्या सत्राचा पेपर देण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांचा जवळपास १५ ते २० मिनिटांचा कालावधी गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळ मिळाला नाही. ही बाब विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी केंद्र संचाकलांना चांगलेच धारेवर धरले. वर्षभर अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक व केंद्र संचालकांच्या चुकीमुळे नुकसान झाले आहे.

केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून १६ शिक्षक नियुक्त केले होते. मात्र यातील काही शिक्षक परीक्षा केंद्रावर उशीरा पोहोचले. तर काही शिक्षक आलेच नाही. त्यामुळे वेळेवर विद्याभारती हायस्कूलमधल्या शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून नेमावे लागले. एका परीक्षा खोलीतील विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्राऐवजी दुपारच्या सत्राचा पेपर देण्यात आला. ही बाब लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांकडून पेपर परत मागविण्यात आले. विद्यार्थ्यांना जास्तीचा वेळ देण्यात आला. बेंचेस कमी असल्याने एका बेंचवर दोन विद्यार्थ्यांना बसवावे लागले.
- अमोल जोशी, परीक्षा केंद्र संचालक, विद्याभारती हायस्कूल गडचिरोली

Web Title: Confusion during the scholarship exam as the supervisor arrives late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.