मेडाराम जत्रेसाठी बससेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:00+5:30
जत्रेसाठी सिरोंचा तालुक्यातील शेकडो भाविक हजेरी लावतात. सिरोंचा भागातील भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तेलंगणा राज्यातील शासकीय आगाराच्या वतीने सिरोंचा तालुक्यात यात्रेकरूंसाठी २७ जानेवारीपासून यात्रा स्पेशल बससेवा सुरू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तेलंगणा राज्यातील व सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मेडाराम येथे ५ ते ७ फेब्रुवारीदरम्यान जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेसाठी सिरोंचा तालुक्यातील शेकडो भाविक हजेरी लावतात. सिरोंचा भागातील भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तेलंगणा राज्यातील शासकीय आगाराच्या वतीने सिरोंचा तालुक्यात यात्रेकरूंसाठी २७ जानेवारीपासून यात्रा स्पेशल बससेवा सुरू करण्यात आली आहे.
मेडाराम येथे दरवर्षी जत्रेचे आयोजन केले जाते. यावर्षीही जत्रा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आहे. या जत्रेत तेलंगणा व महाराष्ट्रातील हजारो भाविक हजेरी लावतात. मनोभावे पूजाअर्चा करून तेथील देवातांचे आशीर्वाद घेतात. तेलंगणा राज्य व सिरोंचा तालुक्यातील लोकांचे दररोजचे संबंध आहे. विविध कामे, व्यापार आदींसाठी त्यांचा संपर्क येतो. सिरोंचा तालुक्यात तेलगू भाषीक असणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे या तालुक्यातून मेडाराम जत्रेसाठी भाविकांचे जत्थे दाखल होतात. यात्रा सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वीपासून अनेक भाविक मेडाराम येथे जातात. काही लोक छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी जातात. अशा भाविक व व्यावसायिक लोकांसाठी प्रवासाची सुविधा व्हावी, या हेतूने यावर्षी तेलंगणा राज्यातील आगाराच्या वतीने बससेवासुरू करण्यात आली आहे.
१०० बसगाड्या सोडण्याचे तेथील शासकीय आगाराचे नियोजन असून सदर बससेवेचा शुभारंभ सोमवारी करण्यात आले. ९ फेब्रुवारीपर्यंत यात्रा स्पेशल बसगाड्या सोडण्यात येणार आहे. महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराच्या वतीने सुद्धा काही बसगाड्या यात्रेकरूंसाठी सोडण्यात येणार आहे.