बोगस बियाणे व खत विक्रीबाबत दक्ष राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:00 AM2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:02:02+5:30

खते, बियाणे, कीटकनाशके यांच्या मागणी व पुरवठ्याबाबतचे नियोजन करण्यात आले. येत्या खरीप हंगामात २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड अपेक्षित आहे. त्यादृष्टीने खते, कीटकनाशके व बियाणांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आले आहे.

Be careful about selling bogus seeds and fertilizers | बोगस बियाणे व खत विक्रीबाबत दक्ष राहा

बोगस बियाणे व खत विक्रीबाबत दक्ष राहा

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : खरीपाच्या नियोजनाचा आढावा, २.२२ लाख हेक्टरवर पेरणीचा लक्ष्यांक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीला सुरूवात झाली आहे. लवकरच पेरणीलाही सुरूवात होणार असल्याने जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या खते व बियाण्यांचा आढावा जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी गुरूवारी घेतला. बोगस बियाणे व खतांची विक्री होणार नाही, यासाठी कृषी विभागाने दक्ष असले पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे आदी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान येत्या खरीप हंगामाच्या पूर्व तयारीबाबत चर्चा करण्यात आली. खते, बियाणे, कीटकनाशके यांच्या मागणी व पुरवठ्याबाबतचे नियोजन करण्यात आले. येत्या खरीप हंगामात २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड अपेक्षित आहे. त्यादृष्टीने खते, कीटकनाशके व बियाणांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आले आहे. चालू खरीप हंगामासाठी कृषी आयुक्तालयामार्फत एकूण ५२ हजार ५०० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर केले आहे. खरीप हंगामात टप्प्याटप्प्याने खत उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे बियाणे व खत उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर भरारी पथके तयार केली जाणार आहेत. तक्रार निवारण समित्यांची स्थापना केली जाईल. निरिक्षकांकडून बोगस बियाणे व खतांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे, अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. बैठकीला महाबिज, विदर्भ, को ऑपरेटीव्ह फेडरेशन, कृषी निविष्ठा वितरक, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हजर होते.

खते व बियाणांचा तुटवडा नाही
कृषी क्षेत्राचे महत्त्व ओळखून लॉकडाऊनच्या कालावधीतही कृषी व कृषीवर आधारीत उद्योग सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत खते व बियाणांचा तुटवडा जाणवला नाही. आता बहुतांश उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पावसाळ्यादरम्यानही खते व बियाणांचा तुटवडा जाणवणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला.

लागवडीचे लक्ष्यांक
तालुका लक्ष्यांक (हेक्टर)
गडचिरोली २२,९९५
कुरखेडा १८,९४५
आरमोरी २१,०४५
चामोर्शी ४१,३२५
सिरोंचा १६,६४५
अहेरी १४,७४०
एटापल्ली २०,५९०
धानोरा २३,००५
कोरची १२,२४०
देसाईगंज ११,७९५
मुलचेरा ९,५३५
भामरागड ९,३४०
एकूण २,२२,१००

Web Title: Be careful about selling bogus seeds and fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती