तालुका निर्मितीचीही मागणी : अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचा पुढाकारअहेरी : अहेरी जिल्हा निर्माण करणे, वेगळा विदर्भ राज्य निर्मिती यासह जारावंडी, जिमलगट्टा, कमलापूर, असरअल्ली, पेरमिली, आष्टी आदी तालुक्यांची निर्मिती करावी या मागणीसाठी तालुक्यातील दुर्गम भागात स्वाक्षरी मोहीम अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. जारावंडी, कसनसूर या दुर्गम भागातही स्वाक्षरी मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. मोहिमेत छापील पत्रक असून त्यात नागरिकाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, गावाचे नाव व स्वाक्षरीसाठी रकाना दिलेला आहे. जारावंडी तालुका निर्मितीसाठी नामदेव मडावी यांनी सक्रिय सहभाग घेतला असून इतर भागांमध्ये त्या- त्या क्षेत्रातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. अहेरी जिल्हा निर्माण करून नवीन तालुके निर्माण करावेत, अशी मागणी मागणी या मोहिमेतून केली जाणार आहे. दुर्गम भागात जिल्हा प्रशासन पोहोचत नसल्याने या भागातील नागरिक विविध योजना व लाभापासून वंचित आहेत. दुर्गम भागाच्या विकासासाठी अहेरी जिल्हा निर्माण करून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करणे गरजेचे आहे. त्याकरिता अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर शासनाकडे सदर मोहिमेचे पत्रके पाठविले जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
अहेरी जिल्हा, वेगळ्या विदर्भासाठी दुर्गम भागात स्वाक्षरी मोहीम
By admin | Updated: November 19, 2015 01:57 IST