पालकमंत्र्यांनी घेतला दिलेल्या निधीचा हिशेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 05:00 AM2021-04-08T05:00:00+5:302021-04-08T05:00:29+5:30

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील प्रमुख शहरात ऑडोटोरियम उभारण्यासाठी लागणारा निधी व कामांसाठीचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती दिली. यातून चांगल्या प्रकारे ऑडोटोरियम जिल्ह्यात उभारण्यात येणार असून, त्यासाठी अंदाजे १०५ कोटी रुपये लागणार आहेत. सदर प्रस्तावाबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

Account of the funds given by the Guardian Minister | पालकमंत्र्यांनी घेतला दिलेल्या निधीचा हिशेब

पालकमंत्र्यांनी घेतला दिलेल्या निधीचा हिशेब

Next
ठळक मुद्देआरोग्य सुविधांसह इतर कामांना पुरेसा निधी देणार, जिल्हा रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया विभागाचे लोकार्पण

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याचे नगर विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अचानक दौरा काढून आपल्या विभागामार्फत वाटप केलेल्या निधीचा सविस्तर हिशेब जाणून घेतला. नगरपालिका प्रशासनाचा आढावा घेताना त्यांनी दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून केल्या जात असलेल्या कामांची माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि इतर विकासात्मक कामांसाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा पालकमंत्र्यांनी   दिली.
पालकमंत्री शिंदे यांनी जिल्ह्यात विविध विषयांचा आढावा घेतला. यामध्ये कोरोना, आरोग्य सुविधा, धान खरेदी व साठवणूक, शेती संलग्न विषय, वीज समस्या व नियोजनामधील कामांची सद्य:स्थिती यांचा समावेश होता. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार कृष्णा गजबे, आमदार डॉ. देवराव होळी, भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, नगराध्यक्ष योगिता पिपरे व तालुका, तसेच जिल्हास्तरावरील सर्व विभाग प्रमुख ऑनलाइन स्वरूपात उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील प्रमुख शहरात ऑडोटोरियम उभारण्यासाठी लागणारा निधी व कामांसाठीचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती दिली. यातून चांगल्या प्रकारे ऑडोटोरियम जिल्ह्यात उभारण्यात येणार असून, त्यासाठी अंदाजे १०५ कोटी रुपये लागणार आहेत. सदर प्रस्तावाबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
या बैठकीआधी पालकमंत्र्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील नूतनीकरण केलेल्या शस्रक्रिया विभागाचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या इतर सुधारणांची प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाइन स्वरूपात विविध विभागांचा त्यांनी आढावा घेतला. विकास कामांबाबत विभाग प्रमुखांना सूचनाही केल्या. 
यावेळी उपस्थित आमदारांनी आपापल्या क्षेत्रातील विकास कामांचे प्रस्ताव व अडचणी पालकमंत्र्यांकडे मांडल्या. यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही शिंदे यांनी संबंधित प्रशासनाला दिले. 

कोरोनाबाबत अधिक खबरदारी घ्या
कोरोनाबाबत सर्व संबंधित यंत्रणांचा आढावा घेत असताना पालकमंत्र्यांनी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज असून, संसर्ग रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. संपूर्ण राज्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातही वाढ निदर्शनास येत आहे. आता पुन्हा सर्व शासकीय यंत्रणांनी मागील कालावधीत केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी, असे पालकमंत्री म्हणाले.

प्रलंबित प्रस्तावांबाबत सचिवस्तरावर निर्देश
जिल्ह्यातील विविध कामांबाबत आढावा घेत असताना आलेल्या अडचणींबाबत पालकमंत्री शिंदे यांनी राज्यस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत विविध विभागाचे सचिव, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठकीतूनच संवाद साधला. ते प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यामध्ये कोरची तालुक्यातील नवीन वीज जोडणी, मत्स्य शेती, धान साठवणूक गोदामे व  दुरुस्ती या कामांचा प्रामुख्याने समावेश होता.

मत्स्य शेती, स्ट्रॉबेरी व जांभूळ या प्रकल्पांकडे लक्ष वेधले

जिल्ह्यात शेतीमध्ये आधुनिक शेती करण्याकडे कल वाढीला लागला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालकमंत्र्यांनी मत्स्य शेतीला चालना देण्याबाबत सूचना केल्या. मुलचेरा तालुक्यात नव्याने लागण केलेल्या १५०० स्ट्रॉबेरीच्या उत्पादनाविषयी माहिती जाणून घेतली. जर जिल्ह्यात उत्पादन चांगल्या प्रकारे येत आहे, तर निश्चितच त्याची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ शकते. माझ्या जिल्ह्यातून यासाठी रोपे व इतर तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यासाठी शेतकरी जोडून देता येतील, तसेच जिल्ह्यात उत्पादन वाढल्यास निश्चितच प्रक्रिया उद्योगही उभारता येईल. जांभूळ व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांना विक्रीसाठी नागपूर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शेती विभागाच्या आखलेल्या नियोजनाची त्यांनी प्रशंसा केली. या बैठकीवेळी कृषी विभागामार्फत मानव विकास  निधीमधून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानित ट्रॅक्टरचे वाटप पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

Web Title: Account of the funds given by the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.