५९५० लोकांच्या हातांवर शिक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:00 AM2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:48+5:30

शिक्के मारलेल्या लोकांनी किमान १४ दिवस इतर लोकांच्या संपर्कात येवू नये. त्यांच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी त्यांचा संपर्क कमी करून संबंधितांना संसर्गाबाबत गांभिर्यता पटवून द्यावी आणि त्यांना घरात राहण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र या लोकांनी सूचनांचे पालन न केल्यास त्यांना शासकिय रूग्णालयात क्वॉरंटाईनमध्ये सक्तीने ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.

5950 Seals on people's hands | ५९५० लोकांच्या हातांवर शिक्के

५९५० लोकांच्या हातांवर शिक्के

Next
ठळक मुद्देप्रतिसाद न देणाऱ्यांना कक्षात ठेवणार : जीवनावश्यक वस्तू मिळतील, फक्त संसर्गाची काळजी करा- जिल्हाधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याबाहेरील करोनाबाधित क्षेत्रातून आलेल्या ५९५० लोकांच्या हातावर गृह विलगीकरणाचे (होम क्वॉरेंटाईन) शिक्के मारण्याचे काम बुधवारपासून सुरू झाले. मागील १५ दिवसांमध्ये बाहेरील जिल्हे किंवा राज्यातून आलेल्या या लोकांवर आरोग्य विभाग नजर ठेवून आहे. त्यांच्या हातावर शिक्के मारून त्यांना निरीक्षणाखाली घेण्यात येत आहे. त्यांना घरातून बाहेर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पण त्यासाठी त्यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यास त्यांना जबरीने आरोग्य विभागाने तयार केलेल्या विलगिकरण कक्षात ठेवले जाणार आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हे विलगिकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.
शिक्के मारलेल्या लोकांनी किमान १४ दिवस इतर लोकांच्या संपर्कात येवू नये. त्यांच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी त्यांचा संपर्क कमी करून संबंधितांना संसर्गाबाबत गांभिर्यता पटवून द्यावी आणि त्यांना घरात राहण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र या लोकांनी सूचनांचे पालन न केल्यास त्यांना शासकिय रूग्णालयात क्वॉरंटाईनमध्ये सक्तीने ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.
विशेष म्हणजे लोक किराणा मालासारख्या जीवनावश्यक वस्तुच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत, पण ही दुकाने सुरू राहण्याबाबत प्रशासन आवश्यक उपाययोजना करत असल्यामुळे तिथे गर्दी न करता कोरोना संसर्ग रोखण्याची खबरदारी आधी घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. आवश्यक दैनंदिन उपयोगाच्या वस्तू मिळण्यासाठी ती दुकाने सुरू आहेत. भाजीपाला, दूध व किराणा दुकानांमध्ये साठा करण्यासाठी नागरीकांनी गर्दी करू नये. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्या. इतर लोकांपासून अंतर ठेवून राहा असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
विनाकारण बाहेर न फिरता पोलिसांना सहकार्य करा, नाहीतर नाईलाजास्तव त्यांना सक्तीने कारवाई करावी लागेल. संचारबंदीनंतर सामान्य जनजीवन काही प्रमाणात बिघडले आहे. परंतू आता हळूहळू घरी राहण्याची सवय लावावी लागेल. पुढचे २० दिवस महत्त्वाचे आहेत, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजातील प्रत्येक घटकासाठी या जागतिक संसर्गाला लढा देणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकाºयांनी म्हटले आहे.
दरम्यान संचारबंदीची अंमलबजावणी बुधवारी गडचिरोलीत बºयापैकी झाली. मात्र तरीही काही उत्साही युवक घराबाहेर पडले. त्यांना पोलिसांचा प्रसाद खावा लागला.

तहसीलदारांवर महत्त्वाची जबाबदारी
देशभरात २५ मार्चपासून पुढील २१ दिवस लॉक डाऊन जाहीर केल्यानंतर मार्गदर्शक तत्वानुसार तहसीलदार हे त्यांच्या कार्यक्षेत्रात आता ‘इन्सिडन्ट कमांडर’ म्हणून कार्यरत राहतील. सर्व तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाचे नागरिकांकडून कटेकोरपणे पालन करु न घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करायच्या आहेत. वैद्यकीय सेवा, औषधाचे दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी-विक्री करणे याकरीता सवलती दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे शासकीय, निमशासकीय कर्यालये व अत्यावश्यक सेवा देणारे काही खाजगी कार्यालये, तेथील अधिकारी कर्मचाºयांना त्यांच्या कर्यालयात जाण्याकरीता देखील मुभा दिलेली आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीत रोगाचा प्रसार होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यासंबंधात नियमन करण्याची जबाबदारी संबंधित तहसीलदारांवर राहणार आहे. तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी, पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील ज्या अधिकारी/कर्मचाºयांच्या सेवा घेणे अत्यावश्यक वाटते त्या सर्वांच्या सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार असतील. त्यांनी कोणत्याही प्रकारचा कामचुकारपणा केल्याचे निदर्शनास आल्यास तहसीलदार हे त्या संबधित अधिकारी किंवा कर्मचाºयाविरोधात गुन्हा दाखल करू शकतील.

संचारबंदी अधिक कडक होणार- बलकवडे
पोलीस रस्त्यावर नागरिकांना संचारबंदीबाबत सूचना करत आहेत. अशावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व जनतेने सहकार्य करून एकत्र येवू नये म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. युवकांचे बाहेर फिरण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यांनी स्वत:ला आवर घालावा, अन्यथा पोलीस आता अधिक सक्तीने संचारबंदीची अंमलबजावणी करतील. विविध धार्मिक स्थळांवरील गर्दीही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्या ठिकाणी फक्त एक व्यक्तीच पुजाअर्चा करण्यासाठी राहील. संचारबंदी ही सर्वांनाच लागू आहे, त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून कोणीही बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.

Web Title: 5950 Seals on people's hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.