3,000 farmers await respect fund | ४१ हजार शेतकऱ्यांना सन्मान निधीची प्रतीक्षा
४१ हजार शेतकऱ्यांना सन्मान निधीची प्रतीक्षा

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या चकरा : ७४ हजार जणांना मिळाला पहिला हप्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केंद्र शासनाने सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील ७४ हजार २३८ शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. अजूनही ४१ हजार ६२६ शेतकरी या योजनेचा लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांची नोंदणीची प्रक्रिया सुरूच आहे.
लोकसभा निवडणुकीच्या एक महिन्यापूर्वी केंद्र शासनाने किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतीवर्षी सहा हजार रुपये अनुदान तीन टप्प्यांमध्ये दिले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शेतकऱ्यांकडून तत्काळ कागदपत्रे मागून काही शेतकऱ्यांना लाभ द्यावा, असे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले होते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. ज्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला, त्याची प्रसिद्धी करून विद्यमान केंद्र शासनाने निवडणूक जिंकली. निवडणुकीनंतर मात्र पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्याच्या कामाची गती अतिशय मंदावली आहे. सुरूवातीला दोन हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचे शासनाने घोषित केले होते. त्यानंतर पुन्हा बदल करून सर्वच शेतकऱ्यांना आता लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे.
महसूल विभागाने गोळा केलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १ लाख १५ हजार ८६४ लाभार्थी अपेक्षित आहेत. या सर्व शेतकऱ्यांचा डाटा पीएम किसान ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. या एकूण शेतकऱ्यांपैकी ७४ हजार २३८ शेतकऱ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. तर ३० हजार २९९ शेतकऱ्यांना दुसरा लाभ देण्यात आला आहे. तर ४१ हजार ६२६ शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
शेतकऱ्यांमध्ये असंतोष
काही शेतकऱ्यांना दुसराही हप्ता उपलब्ध झाला आहे, तर काही शेतकºयांना मात्र पहिल्याच हप्त्याची रक्कम उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपला अर्ज वैध ठरला की नाही, याविषयी काही शेतकऱ्यांमध्ये शंका निर्माण झाली आहे. सदर शेतकरी वेळोवेळी तलाठी कार्यालय व बँकेत जाऊन विचारणा करीत आहेत. योजना सुरू होऊन आता सहा महिन्यांचा कालावधी उलटत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधुक वाढली आहे. पात्र शेतकऱ्यांची नोंदणी करण्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी आहे.

Web Title: 3,000 farmers await respect fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.