२०२५ चं 'जमाल कुडू', 'धुरंधर'मधील गाण्याची चर्चा; अक्षय खन्नाचा डान्स तुफान व्हायरल, व्हिडीओ बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 11:27 IST2025-12-07T11:23:35+5:302025-12-07T11:27:07+5:30
अक्षय खन्नावर चित्रित झालेलं 'धुरंधर'मधील गाणं सध्या चांगलंच गाजतंय. अक्षय खन्नाला नाचताना पाहून नेटकरी चांगलेच आनंदी झाले आहेत

२०२५ चं 'जमाल कुडू', 'धुरंधर'मधील गाण्याची चर्चा; अक्षय खन्नाचा डान्स तुफान व्हायरल, व्हिडीओ बघाच
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुरुवात केली आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटातील रणवीर सिंगचा अभिनय, अॅक्शन आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. मात्र, चित्रपटाच्या सर्व गाण्यांमध्ये एका खास गाण्याची जोरदार चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या गाण्यावर अक्षय खन्नाने केलेला डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे. जाणून घ्या या व्हायरल गाण्याबद्दल सर्वकाही.
काय आहे हे गाणं?
अक्षय खन्ना 'धुरंधर' चित्रपटात एका बंदूक व्यापाराला भेटायला जातो. तेव्हा त्याच्या एन्ट्री सीनमध्ये हे गाणं चित्रपटात वाजतं. हे गाणं मूळ बहरीन भाषेतलं आहे. Flipperachi Group ने हे गाणं तयार केलं असून, या गाण्याचं नाव 'FA9LA' असं आहे. Flipperachi आणि हुसेन असीम यांनी हे गाणं गायलं आहे. 'धुरंधर'च्या टीमने या मूळ गाण्याला चित्रपटातील खास प्रसंगासाठी वापरलं आहे.
'धुरंधर' चित्रपटात अक्षय खन्ना 'रहमान डकैत' या नकारात्मक भूमिकेत आहेत. अक्षय खन्ना या गाण्यावर बेधुंद होऊन नाचताना दिसतो. अक्षय खन्नाला अनेक वर्षांनी चित्रपटात असं नाचताना बघून चाहते खूश झाले आहेत. त्यामुळे हे गाणं आणि यावर अक्षय खन्नाने केलेला डान्स चर्चेचा विषय आहे.
'जमाल कुडू' सोबत तुलना
इंटरनेटवर हे गाणं प्रचंड व्हायरल झाले असून, नेटकरी त्याची थेट तुलना रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटातील 'जमाल कुडू' या हिट गाण्यासोबत करत आहेत. 'जमाल कुडू' हे देखील इराणी गाणे होतं, जे 'ॲनिमल'मध्ये बॉबी देओलच्या एन्ट्री सीनमध्ये वापरले होते. त्यामुळे 'धुरंधर' चित्रपटातील व्हायरल झालेलं हे गाणं २०२५ मधील 'जमाल कुडू' आहे, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
'धुरंधर'ला मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादाच्या जोरावर हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या वीकेंडमध्ये १०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. चित्रपटातील अक्षय खन्ना, रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर.माधवन यांच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक होत आहे.