प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने एक वर्षानंतर दाखवला जुळ्या मुलांचा चेहरा, थाटात साजरा केला वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:03 IST2025-12-02T16:03:11+5:302025-12-02T16:03:46+5:30
गेल्या वर्षी दिला जुळ्यांना जन्म, नावंही आहेत खास

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने एक वर्षानंतर दाखवला जुळ्या मुलांचा चेहरा, थाटात साजरा केला वाढदिवस
'कुंडली भाग्य'फेम अभिनेत्री श्रद्धा आर्याने गेल्या वर्षी जुळ्यांना जन्म दिला होता. एक मुलगी आणि एक मुलगा यांचा जन्म झाला. २९ नोव्हेंबर रोजी तिची दोन्ही मुलं एक वर्षाची झाली. तिच्या लेकीचं नाव सिया आणि लेकाचं शौर्य आहे. श्रद्धाने मुलांच्या पहिल्या वाढदिवशी त्यांचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला आहे. आज तिने फोटो पोस्ट करत चाहत्यांना सरप्राईज दिलं. पती राहुल नागलसोबत तिने हे फोटो शेअर केले आहेत.
श्रद्धा आर्याने एक वर्षानंतर आपल्या गोंडस मुलांचा चेहरा रिव्हील केला आहे. सिया आणि शौर्य दोघंही आपल्या आईवरच गेले आहेत. श्रद्धाने शौर्यला तर राहुलने सियाला मांडीवर घेतलं आहे. सिया डोळे मोठे करुन कॅमेऱ्याकडे पाहत आहे तर शौर्य त्याच्याच धुंदीत रमला आहे. दोघांना त्यांच्या पहिल्या वाढदिवसाला क्युट ड्रेस घालून छान तयार केलं आहे. तर श्रद्धा आर्याही वेस्टर्न आऊटफिटमध्ये सुंदर दिसत आहे. श्रद्धाने वाढदिवसाचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. अगदी थाटात त्यांनी चिमुकल्यांचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे.
श्रद्धाच्या या पोस्टवर इतरही कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. 'सुंदर कुटुंब','किती गोड मुलं आहेत अगदी त्यांच्या पालकांसारखेच सुंदर आहेत' असं चाहते म्हणत आहेत. श्रद्धा आर्याने आपल्या मॅटर्निटी लीव्हनंतर पुन्हा 'कुंडली भाग्य' मालिकेत काम सुरु केलं. प्रीता ही तिची भूमिका आहे. श्रद्धा आर्याने २०२१ साली राहुल नागलसोबत दिल्लीत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तीन वर्षांनी ती आई झाली. त्यांच्या लग्नाला चार वर्ष झाली आहेत.