संकर्षण कऱ्हाडे सादर केली भन्नाट कविता, रसिक प्रेक्षकांनी दाद देत केला वन्समोअरचा शोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 13:47 IST2025-12-02T13:36:09+5:302025-12-02T13:47:06+5:30
संकर्षण कऱ्हाडेच्या नव्या कवितेला रसिक प्रेक्षकांनी दाद देत वन्समोअरचा शोर केला.

संकर्षण कऱ्हाडे सादर केली भन्नाट कविता, रसिक प्रेक्षकांनी दाद देत केला वन्समोअरचा शोर
Sankarshan Karhade New Poem : मराठी सिनेसृष्टीचा सध्याचा सर्वगुण संपन्न अभिनेता म्हणून संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. तो टीव्ही मालिका, सिनेमा, नाटक, लेखन या सर्वच क्षेत्रात पारंगत आहे. त्याचे नाटक लागले की नाट्यगृह हमखास फुल होतात. संकर्षण कऱ्हाडे हा त्याच्या अभिनय, सूत्रसंचालनाबरोबरच त्याच्या कवितांसाठीही लोकप्रिय आहे. मनाला भिडणारे शब्द, त्यातून चपखलपणे मांडले जाणारे भाव आणि अनेकदा आपल्या दैनंदिन जीवनातील, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरील संकर्षणच्या कविता कायमच चाहत्यांना आवडतात. आता त्याची एक कविता लक्ष वेधून घेत आहे.
संकर्षणनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने "चहा"वर एक छान कविता सादर केली आहे. त्याने ही कविता सादर केल्यानंतर रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत वन्समोअरचा शोर केला.
संकर्षण म्हणतो....
परवा एक जण भेटले, म्हणले हे काय बरोबर नाय...
हल्ली कविता इन्स्टाग्रामला टाकली नाही, काय सुचत नाही की काय..
पेटून उठल्यासारखा मी एका जागी बसलो, कागद-पेन घेऊन एकदम साहित्यिकाच्या भूमिकेत घुसलो
एकही शब्द मदतीला माझ्या धावून नाही आला, कशावर लिहावी कविता या विचारात बराच वेळ गेला
राग काढत बायकोला म्हटलं जरा बायकोसारखी वाग, नवरा कधीपासून लिहितोय कपभर चहा तरी टाक
ती म्हणाली फाडलेल्या कागदाचे किती बोळे झालेत पाहा,आणि कवितेच्या नावाखाली सकाळपासून १३ कप झालाय चहा...
बायकोचा हा बाण माझ्या काळजात घुसला, ताजा-ताजा विषय मला कवितेसाठी सुचला...
म्हणलं आता काय लिहितो, ते तुम्ही फक्त पाहा,कवितेचा विषय आहे, सर्वांच्या आवडीचा चहा...
चढायचा असेल पर्वत तर कमरेतून वाकावं लागतं आणि हवा असेल चहा तर आधी तो आपल्याला टाकावा लागतो...
चहा पिणाऱ्यांपेक्षा हल्ली विकणारेच वाढलेत, उद्योग नसल्यासारखे त्या चहाचे शेकडो प्रकार काढलेत...
आल्याचा, गुळाचा, साखरेचा, गवताचा… पंढरपूरचा, येवल्याचा, टपरीचा, चुलीवरचा…
बार्बीक्यू, बासुंदी, टिपटिप, इराणी... मटका, काळा, कम दूध, ज्यादा पाणी...
क्रिकेट या खेळाशीसुद्धा चहाचा संबंध दिसतो, म्हणून तिथेसुद्धा कॉफी नाही, तर टी-टाइम असतो...
राजकारणातही चहा करतो मनोमिलनाचं काम, ते करायला विरोधकही करतात चहापान...
चहा पिणाऱ्यांची लागे तंद्री तो पावे अंतर्धान आणि मन लावून चहा विकणारा होतो पंतप्रधान...
आता इतक्या भारी पेयाला हलक्यात कसं घ्यावं? जवळच्यांना जवळ घ्यावं आणि चहाच प्यायला बसावं…
नाही नाही म्हणता म्हणता मला चहावर कविता सुचली हो... तिथून चहाचा पेला घेऊन येणारी बायको मला दिसली हो...
चौदावा चहा देत ती म्हणाली, अजून किती देऊ? तिला म्हणालो, हाच चहा आपण अर्धा अर्धा पिऊ...