पूजाचा उखाणा ऐकून सर्वांच्या डोळ्यात आलं पाणी, तर सोहमच्या उखाण्यानंतर एकच हशा पिकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:14 IST2025-12-02T18:07:29+5:302025-12-02T18:14:19+5:30
पूजानं लग्नप्रसंगी घेतलेला उखाण्यात फक्त पती सोहमचेचं नाही तर बांदेकर कुटुंबातील प्रत्येकाचं नाव घेतलं.

पूजाचा उखाणा ऐकून सर्वांच्या डोळ्यात आलं पाणी, तर सोहमच्या उखाण्यानंतर एकच हशा पिकला
Pooja Birari Soham Bandekar Wedding : मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत.आज, २ डिसेंबर रोजी मराठी अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला आहे. लोणावळ्यातल्या एका रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडलाय. या सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र त्यापेक्षाही जास्त चर्चेत आलाय, तो तिनं घेतलेला उखाणा. पूजानं लग्नप्रसंगी घेतलेला उखाण्यात फक्त पती सोहमचेचं नाही तर बांदेकर कुटुंबातील प्रत्येकाचं नाव घेतलं.
पूजा उखाना घेत म्हणाली...
"घडलं सगळं अचानक थोडी भांबावले... कळलंच नाही कसं व्हावं व्यक्त...
आपसूकच या नात्यात गुंतत गेले कारण, आहेत ते तितकंच मस्त!
एकेकाला भेटावं म्हणून माणसांची केली वाटणी...
सगळ्यात आधी लौकीकला भेटले कारण म्हणे तोच आहे याची आद्यपत्नी...
घराखाली भेटायला येतेस का? म्हणून याने मला गंडवलंच अन् थेट आईसमोर नेऊन बसवलंच...
माझ्या मनातील हुरहूर त्यांनाही (आईला ) जाणवली... त्याच म्हणाल्या काही काळजी करू नकोस...
मलाही कळत नाहीये कसं व्हावं React... म्हटलं आताच एकमत झालंय तर आयुष्यभर अशाच राहू Intact!
पुढे भेटले आजीला... दोघी आम्ही बिचाऱ्या एकमेकींकडे बघतच राहिलो...
भीती वाटली जाम, पटकन पाया पडले आणि सटकले तिकडून पुसत कपाळावरचा घाम...
अरे! बघू तरी दे... कोण आहे मुलगी असं म्हणत बाबांशी झालं व्हिडीओ कॉलवर बोलणं...
त्यादिवसापासून मनात कोरलं गेलं त्यांचं ते गोड हसणं...
हममम... अगदी तुडुंब, मित्रांपासून भावंडांपर्यंत, आत्या-काकांपासून... मामा-मावशीपर्यंत...
यांच्या घरचे सगळेच आहेत भन्नाट.... आंबट, गोड, तिखट, चमचमीत जणू पाणीपुरी चाट!
'हो'कार देत सोहमला आपलंसं केलं घर ताऱ्यांचं... आज प्रसंगी नाव घेते साऱ्यांच...
महेश काका, स्वाती काकू, प्रार्थना ताई, साई दादा, रोहित दादा, प्रणिता काकू, नागेश काका, संकल्प, शारण्य दादा, अस्मिता दीदी, मीरा काकू, अवधूत भाई, प्रभा काकू, अर्वी, भाग्यश्री, राजवीर, ज्योती मॅम, निकिता, क्रिश... अरे बापरे हुश्श...
यासोबतच संपूर्ण बांदेकर परिवाराला एकच घालते साद... आयुष्यभर असं राहू द्या प्रेम आणि आशीर्वाद...
बांदेकरांची सून म्हणून आले... तरीही मुलीचं नातं असेल कायमचं...
माझ्या आईच्या विष्णुरुपी जावयाचं.. आज सगळ्यांच्या समक्ष नाव घेते सोहमचं.
पूजाचा हा उखाणा ऐकून ऐकूण उपस्थित सर्व जण भावुक झाले. यावेळी पूजाला अश्रू अनावर झाले होते. यानंतर सोहम पुढे पूजासाठी उखाणा घेतला. तो म्हणाला, "माझ्या बायकोचं नाव आहे पूजा…तेरे सिवा ना कोई मेरा दूजा". त्याच्या या उखाण्यानंतर उपस्थितांनाही हसू आवरेनासं झालं. पूजा आणि सोहमवर सध्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. कालच दोघांची हळद उत्साहात झाली. तर रात्री संगीत फंक्शनही जल्लोषात पार पडलं. या दोघांचं लग्न मुंबई नाही तर लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये पार पडलं. या लग्नाला अनेक मराठी कलाकारांची उपस्थिती होती. गेल्या काही दिवसांपासून पूजा आणि सोहमच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. आज अखेर या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.