Join us

मनू पंजाबीसाठी मोनालिसाने केले स्वत:ला नॉमिनेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 15:01 IST

बॉयफ्रेंड विक्रांत सिंह याच्यासोबत लग्नाच्या बंधनात अडकण्याच्या तयारीत असलेल्या मोनालिसाचा जीव अजूनही घरातील तिचा जीवलग मित्र मनू पंजाबी याच्यात ...

बॉयफ्रेंड विक्रांत सिंह याच्यासोबत लग्नाच्या बंधनात अडकण्याच्या तयारीत असलेल्या मोनालिसाचा जीव अजूनही घरातील तिचा जीवलग मित्र मनू पंजाबी याच्यात गुंतलेला असल्याचे बघावयास मिळते आहे. कारण लग्नाच्या बंधनात अडकण्याच्या काही तास अगोदरच तिने स्वत:ला मनू पंजाबीसाठी नॉमिनेट केले आहे. त्यामुळे मनू पंजाबीबद्दल तिच्या मनात असलेले प्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. शोच्या सुरुवातीपासूनच मनू पंजाबी आणि मोनालिसा यांच्यातील संबंध चर्चेचा विषय ठरले आहेत. घरातील दोघांचे वावरणे हे मैत्रीच्या नात्यापलिकडचे असल्याने त्यांच्यातील नाते कधीच लपून राहिले नाही. मात्र, जेव्हा बॅटरी चार्ज या टास्कदरम्यान मोनाचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंह याने घरात एंट्री करून मनू पंजाबीचे उणेदुणे काढले तेव्हांपासून या दोघांच्या नात्यात दरार निर्माण झाली. मनू पंजाबी हा मोनापासून दूर राहणे पसंत करीत असला तरी, मोनालिसाचे मनू प्रतीचे प्रेम तसूभरही कमी झालेले दिसत नाही. ती कुठल्या ना कुठल्या कारणाने मनूशी जवळीकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बघावयास मिळत आहे. सलग दोन आठवडे मनू पंजाबीसाठी स्वत:ला नॉमिनेट करून तिने हे दाखवूनही दिले आहे. विशेष म्हणजे शोच्या शेवटच्या आठवड्यात स्वत:ला नॉमिनेट करून तिच्या मनात मनू पंजाबीसाठीचे प्रेम उघड झाले आहे. ‘पोस्टमन’ टास्कमध्ये जेव्हा तिच्याकडे मनू पंजाबी याचे पार्सल आले होते, तेव्हा तिने ते भट्टीत टाकून स्वत:ला नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला. मनू पंजाबीने माझ्यासाठी स्वत:ला नॉमिनेट करू नकोस हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने मनूचे काहीही न ऐकता स्वत:ला नॉमिनेट करीत मनूसाठी ग्रॅण्डफिनालेचा मार्ग मोकळा केला. आता मोना बॉयफ्रेंड विक्रांत सिंह याच्याबरोबर बिग बॉसच्या घरात लग्न करणार असल्याने येत्या दिवसांमध्ये तिची मनू पंजाबीप्रती काय भावना असेल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.