Video: “आशीर्वाद माझे नाही, फक्त बाबासाहेबांचे"; चैत्यभूमीला पृथ्वीकसोबत घडला खास किस्सा, तुम्हीही कराल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 10:49 IST2025-12-07T10:48:36+5:302025-12-07T10:49:11+5:30
चैत्यभूमीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला गेलेल्या पृथ्वीकसोबत घडला एक भावुक क्षण. हा किस्सा वाचून तुम्हीही अभिनेत्याचं तोंड भरुन कौतुक कराल

Video: “आशीर्वाद माझे नाही, फक्त बाबासाहेबांचे"; चैत्यभूमीला पृथ्वीकसोबत घडला खास किस्सा, तुम्हीही कराल कौतुक
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप काल ६ डिसेंबरला दादर येथील चैत्यभूमीला गेला होता. त्यावेळी पृथ्वीकने पत्नीसोबत मनोभावे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना दिसला. त्यावेळी पृथ्वीकसोबत एक खास घटना घडली. जी वाचून तुम्हीही अभिनेत्याचं कौतुक कराल.
पृथ्वीकच्या एका चाहत्याने या घटनेचा सविस्तर वृत्तांत सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो लिहितो, ''मी दरवर्षी न चुकता ६ डिसेंबर च्या मध्यरात्री ‘चैत्यभूमी’ ला भेट देतो, दादरच्या हवेत त्या दिवशी एक वेगळीच उर्जा जाणवते.. देशाच्या निरनिराळ्या भागांतून, काना-कोपऱ्यातून आलेले सगळे अनुयायी का कुणास ठाऊक ओळखीचे आणि आपले भासतात. या वर्षीही मी नेहमी प्रमाणे तिथे गेलो, ह्या वर्षी इथली सगळी माणसं मला जास्त आपली वाटली.. जणू काही आपले दूरचे नातलगच.. कारण ही तसच खास होतं, कारण ह्यावेळी माझ्यासोबत संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका अभिनेता आणि माझा सख्खा लहान भाऊ पृथ्वीक प्रताप सुद्धा होता..''
''म्हणजे तसं पृथ्विक आणि मी लहानाचे मोठे एकत्र झाल्यामुळे आणि त्यातही मी मोठा असल्यामुळे मला पृथ्विक एक सेलिब्रिटी आहे असं कधी फार जाणवायचं नाही.. पण काल पहिल्यांदा माझं उर भरून आलं होतं... चैत्यभूमीवर आलेला प्रत्येक भीम अनुयायी पृथ्विक सोबत एका वेगळ्याच आदराने आणि आपुलकीने बोलत होता. महाराष्ट्रातल्या दुर्गम भागातून आलेला माझा समाजबांधव भान हरपून त्याच्यासोबत फोटी घेत होता...''
''पण माझा उर भरून येण्याचं कारण खूप वेगळं आहे, त्याला फोटो मागायला येणाऱ्या अनेक लोकांमध्ये, एक तरुण महाविद्यालयीन युवक समोर आला, समता सैनिक दलाचा गणवेश परिधान केलेला तो युवक पृथ्विक ला म्हणाला एम.. सर मी सुद्धा एक छोटासा कलाकार आहे.. माझं अमुक अमुक प्रोजेक्ट आता काही दिवसात येतय, तुमचा आशीर्वाद हवा होता.. असं म्हणत म्हणत तो मुलगा पटकन वाकला आणि पृथ्विकच्या पाया पडायला गेला.. पृथ्विकने त्याला तिथेच अडवलं.. मिठी मारली आणि म्हणाला “मित्रा आशीर्वाद माझे नाही, फक्त बाबासाहेबांचे”
''मी थोडासा स्तब्ध झालो.. माझं मन क्षणार्धासाठी भरून आलं. आपल्या उद्धारकर्त्या प्रति असलेली पृथ्विकाची असलेली कृतज्ञता मला सुखावून गेली. आम्ही लहानपणापासून मामा सोबत चैत्यभूमी ला येतोय.. पण काल लोकांचं पृथ्विक प्रति असलेलं प्रेम आणि आदर पाहून काल मला चैत्यभूमी माझ्या घराप्रमाणे भासली.. आणि चैत्यभूमीच्या स्तूपाकडे पाहून मी पुन्हा एकदा मनोमन बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि पुन्हा एकदा त्यांचे आभार मानले. थँक्यू बाबासाहेब.. ही सगळी पुण्याई तुमचीच आहे.''