कमल हासन यांना वयाच्या ७० व्या वर्षी मिळाली सरकारी नोकरी, आईचे स्वप्न पूर्ण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:14 IST2025-12-02T16:12:47+5:302025-12-02T16:14:47+5:30
७० व्या वर्षी कमल हासन यांना मिळाली सरकारी नोकरी! आईचं स्वप्न पूर्ण झाल्यावर म्हणाले....

कमल हासन यांना वयाच्या ७० व्या वर्षी मिळाली सरकारी नोकरी, आईचे स्वप्न पूर्ण!
Kamal Haasan : सरकारी नोकरी मिळाली की आयुष्य सेट होईल, ही भावना भारतीय कुटुंबांमध्ये रुजलेली आहे. सुरक्षितता, चांगले वेतन, निवृत्तीचे फायदे आणि समाजात मिळणारी प्रतिष्ठा यामुळे अनेकांना सरकारी नोकरीत रस असतो. सुपरस्टार कमल हासन यांच्या आईचीही अशीच इच्छा होती की त्यांच्या मुलाला रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळावी. पण, कमल हासन यांना अभिनयात रस असल्याने, त्यांनी आईची इच्छा बाजूला ठेवून चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले. मात्र, आता वयाच्या ७० व्या वर्षी कमल हासन यांनी आपल्या आईचे हे स्वप्न एका अनोख्या पद्धतीने पूर्ण केले आहे.
कमल हासन अलीकडेच केरळमधल्या हॉर्टस आर्ट अँड लिटरेचर फेस्टिव्हलला हजर होते. तिथे अभिनेत्री मंजू वारियर सोबतच्या एका सेशनमध्ये त्यांनी सिनेमा आणि राजकारणावर चर्चा केली. यावेळी त्यांना "राज्यसभा खासदार झाल्यावर कसं वाटलं?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, "मी जेव्हा साइन करायला गेलो, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर सर्वात आधी माझे आई-वडील आले… माझे बाबा डी. श्रीनिवासन अयंगर आणि आई राजलक्ष्मी. मी शाळा सोडलेली होती. आई नेहमी म्हणायची, किमान १०वी पास झाला असतास तर रेल्वे मध्ये सरकारी नोकरी मिळाली असती".
पुढे भावुक होत म्हणाले, "७० वर्षांनंतर जेव्हा मी आत गेलो, सही केली आणि त्यांनी मला माझा रोजचा खर्च दिला. तेव्हा अचानक माझ्या मनात विचार आला आईला सांगावं की, 'मी सरकारी नोकरीत आहे!' मला खूप अभिमान वाटला'". याच कार्यक्रमात कमल हासन यांनी त्यांच्या राजकीय विचारसरणीबद्दलही स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ते स्वतःला मध्यममार्गी मानतात. तसेच, त्यांचे प्रॉडक्शन हाऊस, 'राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल' हे देखील ते ज्या वैचारिक विषयांवर काम करतात, त्याचे समर्थन करतं. कमल हासन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ते मणिरत्नमच्या 'ठग लाईफ' मध्ये दिसले होते.