'धडक २'चा पुरस्कार सिद्धांत चतुर्वेदीकडून नांदेडच्या सक्षम ताटेला समर्पित, भावुक पोस्ट चर्चेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 11:32 IST2025-12-07T11:31:53+5:302025-12-07T11:32:15+5:30
प्रेमसंबंधातून हत्या झालेल्या नांदेडच्या सक्षम ताटेला सिद्धांत चतुर्वेदीने 'धडक २'चा पुरस्कार केला समर्पित; पोस्ट शेअर करत म्हणाला...

'धडक २'चा पुरस्कार सिद्धांत चतुर्वेदीकडून नांदेडच्या सक्षम ताटेला समर्पित, भावुक पोस्ट चर्चेत!
नांदेडमध्ये सक्षम ताटे आणि आचल मामीडवार या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. हे आंतरजातीय प्रेम प्रकरण होतं. याच कारणातून सक्षमची हत्या करण्यात आल्याचं समोर येतंय. १ डिसेंबर रोजी सक्षमचा जन्मदिन होता. दोन-तीन दिवस आधीच म्हणजे २७ नोव्हेंबर रोजी त्याची हत्या करण्यात आली. वडील आणि भावानं हत्या केलेल्या प्रियकर सक्षमच्या मृतदेहाशी आचलने लग्न केलं. आयुष्यभर सक्षमची बायको म्हणून राहणार असल्याचे तिने स्पष्ट म्हटले. हे प्रकरण फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात चर्चेत आलं आहे. यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. यातच बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने या प्रकरणासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्यानं 'धडक २'साठी मिळालेला पुरस्कार सक्षम ताटेला समर्पित केला आहे.
सिद्धांत चतुर्वेदीची भूमिका असलेला 'धडक २' हा चित्रपट प्रेमसंबंधातील संघर्ष आणि त्यातून उद्भवणाऱ्या दुर्दैवी घटनांवर आधारित आहे. ज्यामुळे त्याचे कथानक सक्षम ताटेच्या जीवनाशी जोडले गेले. नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात 'धडक २' या चित्रपटातील अभिनयासाठी सिद्धांत चतुर्वेदीला पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आणि त्यात त्याने जाहीर केले की, त्याने हा पुरस्कार सक्षम ताटे या तरुणाला समर्पित केला आहे.
त्यानं पोस्ट शेअर करत लिहलं, "वर्षातील पॉवरपॅक्ड परफॉर्मर... या पुरस्कारासाठी धन्यवाद... पण, हा पुरस्कार फक्त माझा नाहीए. ज्यांना जातीय व्यवस्थेत अपमान सहन करावा लागला, भेदभाव सहन करावा लागला, ज्यांना बहिष्कृत करण्यात आलं होतं,. पण तरीही ज्यांनी स्वतःला सावरत पुन्हा उभं केलं, लढले आणि या जगात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचा हक्क मिळवला. हा पुरस्कार त्या सर्वांचा आहे. माझा हा पुरस्कार दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतो, ज्यानं अंतरजातीय प्रेमाच्या विरोधातून घडलेल्या या ऑनर किलिंगमध्ये आपला जीव गमावला. मी त्याच्या कुटुंबासोबत, त्याच्या गावकऱ्यांसोबत उभा आहे. तुमचं धाडस, तुमचं प्रेम, तुमचं नुकसान हे आम्हाला जाणीव करून देतं की अशा कथा पूर्वीपेक्षा जास्त मोठ्याने अधिक निडरपणे सांगितल्या गेल्या पाहिजेत".