मराठी चित्रपटांचा पंचरंगी सामना!

By Admin | Updated: December 5, 2014 08:54 IST2014-12-05T01:22:05+5:302014-12-05T08:54:51+5:30

एकाच दिवशी अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यास व्यवसायाच्या दृष्टीने कमी-जास्त प्रमाणात सर्वांना फटका बसतो.

Marathi film fraternity match! | मराठी चित्रपटांचा पंचरंगी सामना!

मराठी चित्रपटांचा पंचरंगी सामना!

राज चिंचणकर, मुंबई
एकाच दिवशी अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यास व्यवसायाच्या दृष्टीने कमी-जास्त प्रमाणात सर्वांना फटका बसतो. याचा पूर्वानुभव असतानाही मराठी चित्रपटसृष्टीत त्यापासून कुणी धडा घेत असल्याचे चित्र नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे येत्या १२ डिसेंबर रोजीचा शुक्र वार ! या दिवशी तब्बल पाच मराठी चित्रपट पडद्यावर एकत्र वर्णी लावत असून, मराठी चित्रपटांचा पंचरंगी सामना रसिकांना त्या शुक्र वारी पाहायला मिळणार आहे. परंतु त्याचबरोबर या पाचही चित्रपटांतली स्पर्धा पाहता, त्यांचे तिकीटबारीवरचे भवितव्यही पणाला लागणार आहे.
१२ डिसेंबर रोजी ‘मध्यमवर्ग’ , ‘प्रेमासाठी कमिंग सून’, ‘लव्ह फॅक्टर’, ‘मिस मॅच’ आणि ‘आय.पी.एल.’ असे पाच चित्रपट एकाच वेळी पडद्यावर झळकत आहेत. अभिनेता सिद्धार्थ जाधवने नेहमीच्या चाकोरीपेक्षा वेगळी भूमिका ‘मध्यमवर्ग’मध्ये रंगवली आहे. या चित्रपटात भोजपुरी अभिनेता रवी किशन यांचीही भूमिका असल्याने हा चित्रपट चर्चेत आहे. त्यांच्यासह अनंत जोग, सुजाता जोशी अशा कलावंतांनी काम केले असून, एक धडाकेबाज कथा मांडण्याचा यात प्रयत्न केला आहे. ‘प्रेमासाठी कमिंग सून’ या चित्रपटात आदिनाथ कोठारे, नेहा पेंडसे, जितेंद्र जोशी, विजय पाटकर अशी कलाकारांची तगडी टीम असल्याने हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या इतर चित्रपटांना तोडीस तोड उत्तर देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अंकुर काकतकर दिग्दर्शित या चित्रपटाचे एक आगळे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल पाच नवीन निर्माते निर्मिती क्षेत्रात उतरले आहेत.
प्रेमाची ट्रायोलॉंजी असा गवगवा होत असलेला लव्ह फॅक्टर हा चित्रपट लेखक-दिग्दर्शक किशोर विभांडिक यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. राजेश शृंगारपुरे, कुशल बद्रिके यांच्यासह चित्रपटात प्रथम पदार्पण करणारी खुशबू तावडे अशा कलाकारांचा त्रिकोण यात साधला आहे. गिरीश वसईकर यांनी दिग्दर्शित केलेल्या मिस मॅच या चित्रपटातून मॉंडेल मृण्मयी कोलवालकर पडद्यावर येत आहे. तिच्यासोबत भूषण प्रधान प्रमुख भूमिका साकारत आहे. तर ‘आय.पी.एल.’ या शीर्षकातच वेगळेपण असलेला हा चित्रपट म्हणजे मिस हेरिटेज किताबाची मानकरी ठरलेल्या शीतल उपारेचे पडद्यावरील पदार्पण आहे. साहजिकच खुशबू तावडे, मृण्मयी कोलवालकर आणि शीतल उपारे या अभिनेत्रींमध्ये यानिमित्ताने पडद्यावर अभिनयाचा आगळा सामनाही शुक्र वारी रंगणार आहे.
या पाचही चित्रपटांचे विषय वेगवेगळे असले, त्यांचे एकत्र होणारे प्रदर्शन लक्षात घेता प्रेक्षकवर्ग विखुरला जाण्याची शक्यता अधिक आहे. अर्थात, यातल्या प्रत्येक चित्रपटकर्त्याला आपापला चित्रपटच बाजी मारेल याविषयी खात्री असली, तरी मायबाप प्रेक्षकच त्यांचे भवितव्य ठरवणार आहेत. त्यामुळे येत्या १२ तारखेला कोणता चित्रपट
पडद्यावर तगणार आणि कुणाचे बारा वाजणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: Marathi film fraternity match!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.