"हे सेलिब्रेशन फक्त माझं नाही...", छाया कदम यांनी पुरस्काराचा आनंद साजरा केला 'या' खास माणसांसोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:59 IST2025-11-04T12:58:52+5:302025-11-04T12:59:21+5:30
Chhaya Kadam : 'सैराट'पासून ते 'लापता लेडीज' आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ यांसारख्या चित्रपटांमुळे सध्या चर्चेत असलेल्या लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

"हे सेलिब्रेशन फक्त माझं नाही...", छाया कदम यांनी पुरस्काराचा आनंद साजरा केला 'या' खास माणसांसोबत
'सैराट'पासून ते 'लापता लेडीज' आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ यांसारख्या चित्रपटांमुळे सध्या चर्चेत असलेल्या लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. काही चांगल्या निमित्ताने कुटुंबासोबत गेट-टू-गेदर करण्याची त्यांची इच्छा अखेर पूर्ण झाली, असून हा समारंभ एका अविस्मरणीय सेलिब्रेशनमध्ये बदलला.
दिवाळी आणि नुकताच मिळालेला 'फिल्मफेअरचा ब्लॅक लेडी' पुरस्कार या दोन खास निमित्ताने हे एकत्र येण्याचे ठरले होते. छाया कदम यांनी सांगितले की, खूप दिवसांपासून सगळ्यांच्या मनात गेट-टू-गेदर करण्याची इच्छा होती, पण योग जुळत नव्हता. मात्र, यावेळी त्यांना ही संधी मिळाली. या सेलिब्रेशनमध्ये फक्त घरातली माणसेच नव्हती, तर त्यांच्या वाईट काळात त्यांच्यासोबत मित्र म्हणून उभी राहिलेली आणि आता त्यांच्या कुटुंबाचा भाग झालेली जीवाभावाची माणसेही उपस्थित होती.
खरंतर गेट-टू-गेदर म्हणून एकत्र आलेले हे सगळे पाहता पाहता कधी सेलिब्रेशन मोडमध्ये गेले हे कळलेच नाही, पण त्यामुळे खूप काळानंतर सगळ्यांना दिलखुलास नाचताना पाहून त्यांना खूप आनंद झाला. "आपल्या सुख दुःखात असणारी माणसं आपल्या आनंदातही तितक्याच आपलेपणाने उभी असतात, हे कमाल असते," असे भावुक उद्गार त्यांनी काढले. हे सेलिब्रेशन केवळ माझ्या एकटीचे नाही, तर माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येकाचे आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या दोस्त-मंडळींवर आणि चाहत्यांवर प्रेम व्यक्त केले.
वर्कफ्रंट
छाया कदम यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’मधील त्यांच्या 'मंजू माई' या भूमिकेचे खूप कौतुक झाले. तसेच, कुणाल खेमू दिग्दर्शित 'मडगाव एक्स्प्रेस' या चित्रपटातही त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली. याव्यतिरिक्त, पायल कपाडिया यांच्या 'ऑल वी इमॅजिन ॲज लाईट' या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला, ज्यामुळे त्यांची चर्चा जगभर झाली. त्यांच्या या दमदार कामगिरीमुळे २०२४ हे वर्ष त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरले आहे.