"ते पचवणं फार अवघड गेलं...", दिवंगत अश्विनी एकबोटेंबद्दल शरद पोंक्षेंनी व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:34 IST2025-12-02T14:33:26+5:302025-12-02T14:34:33+5:30
मनात विचार यायलाच नको म्हणून..., जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर शरद पोंक्षेंनी स्वत:ला कसं सावरलं?

"ते पचवणं फार अवघड गेलं...", दिवंगत अश्विनी एकबोटेंबद्दल शरद पोंक्षेंनी व्यक्त केल्या भावना
ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे 'पुरुष' नाटकात सध्या काम करत आहेत. त्यांनी इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं. दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे त्यांची अत्यंत जवळची मैत्रीण होती. अश्विनी एकबोटेंचं २०१६ साली अचानक अपघाती निधन झालं. मैत्रिणीच्या निधनानंतर शरद पोंक्षे यांना धक्का बसला होता. त्याबद्दल नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत भावना व्यक्त केल्या.
'आरपार'युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शरद पोंक्षे म्हणाले, "तो धक्का पचवणं फार अवघड गेलं. मी स्वत:ला २४ तास कामात व्यग्र केलं. ती भानगडच नको. ते विचारच यायला नको. हिंदी मालिका, ४-४ सिनेमे, दिवस रात्र शूटिंग, नाटकांचे प्रयोग यातच असायचो. त्यावेळी ड्रायवर नव्हता तर मी स्वत: ड्राईव्ह करायचो. इतकं थकून यायचं की असं पडलं की झोप लागायची. विचार करायलाच वेळ नाही. मेंदू असा कडकडीत बिझी केला. यातूनही कधीतरी रिकामी जागा राहतेच. त्यातून आठवणी येतात. मग कुठेतरी कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी जाऊन रडायचं."
"आयुष्याचा प्रवास कसा असतो त्यावर मी लिहिलं होतं की एक रेल्वे असते. त्यात आपण चढतो. आपल्या बोगीत दिलेल्या सीटवर बसतो. बॅगा ठेवतो. १३ तासांचा प्रवास आहे. निवांत बसतो. पुढच्या स्टेशनवर एक माणूस येतो आणि सीट शोधत असतो. तो थोडावेळ आपल्या बाजूला बसतो. चौकशी करतो. गप्पा होतात. कधी कधी बाजूची काही माणसं शांतच बसतात काहीच बोलत नाहीत. काही लोक २ तासांसाठीच आलेले असतात पण एवढे बोलतात, चौकश्या करतात. चिवडा वगैरे खातात. आपल्यालाही देतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. कोणी हसतं तर कोणी मख्खं बसलेलं असतं. जाताना निरोप घेताना घरी जायचंही आमंत्रण देतात. यावरुन ज्या स्टेशनवर आपण चढतो ते स्टेशन ठरलेलं आहे आणि ज्या स्टेशनवर एक्झिट घ्यायची तेही ठरलेलं आहे. रेल्वे पुढे जातच राहणार. त्या प्रवासात रेल्वेत काही माणसं घट्ट मित्र होतात. २ तासापूर्वी ओळख झालेल्यावरही आपण विश्वास टाकतो. त्याच्या भरोश्यावर आपलं सामान त्यांच्याजवळ ठेवून बाथरुमलाही जाऊन येतो इतका आपला विश्वास असतो. मग ती माणसं उतरताना आपल्याला वाईट वाटतं. आपण प्रवासभर आठवण काढत राहतो. नंतर आपण फोन वगैरे काही करत नाही कारण तो प्रवास संपलेला असतो. ती माणसं तेवढ्यापुरतीच आपल्या आयुष्यात आलेली असतात. हेच आयुष्य एक प्रवास आहे.कोणीही प्रवासी आपल्याबरोबर पहिल्यापासून शेवटपर्यंत नसणार आहे. ही वास्तविकता कळली पाहिजे. प्रत्येकाची स्टेशन आणि वेळ ठरलेली आहे."