"मी ९ वर्षांचा असताना पहिली गाडी खरेदी केली" सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:47 IST2025-12-02T14:45:33+5:302025-12-02T14:47:16+5:30
सचिन पिळगावकर यांनी थेट वयाच्या नवव्या वर्षी पहिली कार खरेदी केल्याचे सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

"मी ९ वर्षांचा असताना पहिली गाडी खरेदी केली" सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. केवळ अभिनेताच नव्हे, तर यशस्वी दिग्दर्शक, निर्माता, लेखक आणि गायक म्हणूनही त्यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत आपला अमीट ठसा उमटवला. आजही त्यांच्या अभिनयाचे आणि त्यांच्या कारकिर्दीतील अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका जुन्या व्हिडीओमध्ये, सचिन पिळगावकर यांनी थेट वयाच्या नवव्या वर्षी पहिली कार खरेदी केल्याचे सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ही गोष्ट ऐकून मुलाखतकार आणि त्यांची लेक श्रिया पिळगावकर यांची प्रतिक्रियाही अत्यंत लक्षवेधी होती.
सचिन पिळगावकर आणि त्यांची मुलगी श्रिया पिळगावकर यांनी Mashable India ला मुलाखत दिली होती. यावेळी मुलाखतीमध्ये सचिन पिळगावर यांनी वयाच्या ९ वर्षी गाडी घेतल्याचं आणि ती शिकल्याचं सांगितलं. ते म्हणतात की, "मी ९ वर्षांचा होतो, त्यावेळी आताचा हा सी-लिंक नव्हता. मी तेव्हा टायकल वाडी येथे राहायचो. टायकलवाडी शिवाजी पार्क येथे येते. मी ९ वर्षांचा होतो, तेव्हा मी पहिली गाडी खरेदी केली. तिल मॉरिस माइनर बेबी हिंदुस्थान म्हणायचे. या गाडीला बकेट सीट आणि फ्लोअर शिफ्ट गिअर होते. ही पेट्रोलवर धावणारी गाडी होती".
यावेळी मुलाखतकारनं सचिन यांना विचारलं "तुम्ही ती गाडी चालवायचे कशी?" तर सचिन म्हणाले, "नाही ड्रायव्हर होता. पण, मी ९ वर्षांचा असताना, याच वरळी सीफेसवर त्या गाडीमधून गाडी चालवायला शिकलो". सचिन यांनी वयाच्या ९ वर्षी गाडी खरेदी केल्याचं आणि ती शिकल्याचं ऐकून मुलाखातकार आणि श्रिया यांना धक्काच बसला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काही नेटकऱ्यांनी सचिन यांना यावरुन ट्रोल केलं आहे.