मराठी रंगभूमीवरील योगदान(महिला कॅटेगरी): सुकन्या कुलकर्णी ठरल्या लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयरच्या मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 19:38 IST
अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांना मराठी रंगभूमीवरील योगदानासाठी (महिला कॅटेगरी) यंदाच्या लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले. या ...
मराठी रंगभूमीवरील योगदान(महिला कॅटेगरी): सुकन्या कुलकर्णी ठरल्या लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयरच्या मानकरी
अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांना मराठी रंगभूमीवरील योगदानासाठी (महिला कॅटेगरी) यंदाच्या लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कारानंतर सुकन्या यांनी लोकमतचे हृदय आभार मानले. डॉक्टर उल्हास पाटील आणि सुनील तटकरे यांच्या हस्ते गौरव.अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी आविष्कार निर्मित ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकातून अभिनयाची सुरुवात करुन आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘ईश्वर’ या पहिला हिंदी सिनेमात भूमिका साकारली. मात्र सुकन्या कुलकर्णी यांच्या अभिनय कारकिदीर्साठी टर्निंग पॉइंट ठरलं ते झुलवा हे नाटक. प्रेमभावना, प्रेमभंग, बलात्कार अशा विविध गोष्टींचे पदर असलेली भूमिका त्यांनी मोठ्या खुबीने साकारली. त्यामुळेच राज्य सरकारच्या पुरस्कारासह अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार आणि नाट्यदर्पणचा मानाचा पुरस्कार त्यांनी पटकावला. त्यानंतर मात्र सुकन्या कुलकर्णी यांनी मागे वळून पाहिलं नाही. सिनेमा, नाटक यासोबत छोट्या पडद्यावरील मालिकांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली. ‘गावाकडल्या गोष्टी’, ‘महानगर’, ‘कश्मकश’ अशा मालिका त्यांनी साकारल्या. मात्र याच काळात वैयक्तीक जीवनात अपघात आणि आघात होऊनही त्या खचल्या नाही. मोठ्या जिद्दीने त्यांनी यावर मात केली. कुणीही खचून जाईल अशा आजारांवर प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी विजय मिळवला आणि मोठ्या जिद्दीने पुन्हा एकदा उभ्या राहिल्या. ‘जमीन आस्मान’, ‘शांती’ अशा मालिकांमधून त्यांनी पुन्हा एकदा दमदार कमबॅक केलं. ‘वारसा लक्ष्मीचा’, ‘ताईच्या बांगड्या’ आणि ‘सरकारनामा’ सारख्या सिनेमात त्यांनी काम केलं. ‘सरकारनामा’मधील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला. ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकातील त्यांची भूमिकाही विशेष गाजली. ‘आभाळमाया’ मालिकेत त्यांनी साकारलेल्या सुधा जोशी या भूमिकेनं तर मराठी रसिकांवर गारुड घातलं. यानंतर विविध मराठी हिंदी सिनेमांमध्ये सुकन्या कुलकर्णी यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. सिनेमांसोबतच मराठी रंगभूमी आणि मराठी मालिकांमधील त्यांचा अभिनयाचा प्रवास आजही यशस्वीरित्या सुरु आहे. त्यामुळेच अशा या जिद्दी आणि मेहनती अभिनेत्री मराठी रंगभूमीवरील योगदानासाठी महिला कॅटेगरीतील लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर 2017 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.