हिंदी सिनेमात कॉमेडी करताना दिसणार ललित प्रभाकर, म्हणाला- "समृद्ध करणारा अनुभव..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:55 IST2025-12-09T16:51:54+5:302025-12-09T16:55:48+5:30
ललित प्रभाकर आगामी हिंदी सिनेमात कॉमेडी करताना दिसणार आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे

हिंदी सिनेमात कॉमेडी करताना दिसणार ललित प्रभाकर, म्हणाला- "समृद्ध करणारा अनुभव..."
‘वन टू चा चा चा’ या सिनेमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरने धमाल कॉमेडीची झलक दाखवली असून, त्यातील एक आकर्षक ठरलेला भाग म्हणजे मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकरची सिनेमातील खास भूमिका. 'आनंदी गोपाळ' आणि 'मीडियम स्पायसी'सारख्या मराठी चित्रपटांमधील कामगिरीनंतर ललित आता एका बिग बजेट विनोदी हिंदी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याविषयी ललितने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
८ डिसेंबरला ‘वन टू चा चा चा’ या सिनेमाचा टीझर लाँच झाला. यावेळी आशुतोष राणा, अभिमन्यू सिंग, मुकेश तिवारी, हर्ष मयार, अनंत व्ही. जोशी, अशोक पाठक, नय्यरा एम. बॅनर्जी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक राज आणि रजनीश ठाकूर या उत्साही कलाकारांसोबत ललितने उपस्थिती दर्शवली.
या सिनेमाबद्दलचा आपलं मत व्यक्त करताना ललित म्हणाला, “मी खूप काही शिकलोय. माझा अनुभव शब्दांत सांगू शकत नाही. अशा प्रकारची कॉमेडी पडद्यावर खूप मिसिंग होती. एवढ्या उत्तम कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूप समृद्ध करणारा ठरला. मला अभिनय करणं का गरजेचं याची पुन्हा जाणीव झाली. कारण योग्य लोकांसोबत कॉमेडी करताना ती तितकीच आनंददायी होते.”
साजन गुप्ता, विजय लालवाणी आणि नताशा सेठी निर्मित, तसेच अमित गुप्ता सहनिर्मित 'वन टू चा चा चा' हा चित्रपट मनोरंजक कथेसह १६ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी सिनेमात ललितला कॉमेडी करताना पाहण्यासाठी ललितचे चाहते खूप उत्सुक आहेत.