पुन्हा एकदा सातासमुद्रापार प्रशांत दामलेंच्या नाटकांचे प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 11:44 IST2017-03-17T06:14:09+5:302017-03-17T11:44:09+5:30
'गेला माधव कुणीकडे' या नाटकाचे विश्वविक्रमी दहा हजाराहून अधिक प्रयोग करुन गिनीज बुकात नोंद करणारे अभिनेता प्रशात दामले. प्रसन्न, ...

पुन्हा एकदा सातासमुद्रापार प्रशांत दामलेंच्या नाटकांचे प्रयोग
' ;गेला माधव कुणीकडे' या नाटकाचे विश्वविक्रमी दहा हजाराहून अधिक प्रयोग करुन गिनीज बुकात नोंद करणारे अभिनेता प्रशात दामले. प्रसन्न, हसरं व्यक्तीमत्त्व, कुशल अभिनय, उत्कृष्ट संवादफेक, कॉमेडीचं अचूक टायमिंग आणि नेमकी देहबोली यामुळे प्रशांत दामले यांनी महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील मराठी नाट्यरसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.रंगभूमीवर त्यांनी आजवर विविध विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यामुळेच त्यांना रंगभूमीचा विक्रमादित्य असंही म्हटलं जाते. आजही न थकता तितक्याच जोमानं रसिकांचं दिलखुलास मनोरंजन करण्याचं काम प्रशांत दामले आपल्या नाटकातून करत आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात त्यांच्या विविध नाटकांचे प्रयोग सुरु असतात. आता पुन्हा एकदा प्रशांत दामले यांच्या नाटकांची दमदार एक्स्प्रेस सातासमुद्रापार जाणार आहे. आजवर आपल्या विविध नाटकांचे प्रयोग प्रशांत दामले यांनी परदेशात सादर केले आहेत. आता पुन्हा एकदा प्रशांत दामले यांच्या अभिनयाची जादू परदेशातील नाट्यरसिकांना अनुभवता येणार आहे. सध्या मराठी रंगभूमीवर गाजत असलेले 'कार्टी काळजात घुसली' या नाटकाचा प्रयोग येत्या 31 मार्चला दुबईत रंगणार आहे. दुबईतल्या शेख रशिद ऑडिटोरियममध्ये कार्टी काळजात घुसली या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. प्रशांत दामले आणि तेजश्री प्रधान यांची प्रमुख भूमिका असलेलं नाटक सध्या बरंच गाजतंय. त्यामुळं दुबईतल्या नाट्यरसिकांना या धम्माल नाटकाचा अनुभव घेता येणार आहे. खुद्द प्रशांत दामले यांनी सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर याची माहिती दिली आहे. याशिवाय प्रशांत दामले यांचं सध्या गाजत असलेलं आणखी एक नाटक सातासमुद्रापार जाणार आहे.'साखर खाल्लेला माणूस' हे नाटक कॅनडात सादर करण्यात येणार आहे.कॅनडातील रसिकांसाठी या नाटकाचे प्रयोग होणार असल्याची माहिती प्रशांत दामले यांनी फेसबुकवर दिली आहे. 26 मे रोजी कॅनडाच्या कॅल्गरीमध्ये, 27 मे रोजी एडमॉन्टॉन आणि व्हॅनक्युअर तसंच 28 मे रोजी कॅनडाच्या टोरंटोमध्ये साखर खाल्लेला माणूस या नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि प्रशांत दामले, शुभांगी गोखले, संकर्षण क-हाडे आणि ऋचा आपटे अभिनीत या नाटकाला महाराष्ट्रातील मराठी रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. कॅनडामधील नाट्य रसिकांना हार्दिक आमंत्रण देत असल्याची पोस्ट प्रशांत दामले यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. याशिवाय ऍमस्टरडॅमच्या स्थानिक कलाकारांच्या खास आग्रहास्तव 'चार दिवस प्रेमाचे' हे नाटक प्रशांत दामले त्या कलाकारांसोबत करणार आहेत. प्रयोग एकच असला तरी या कलाकारांचा उत्साह शंभर प्रयोगांचा असल्यामुळे धन्य झाल्याची भावना प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे. नाटकाच्या रिहर्सला सुरुवात करणार असून 26 मार्चला या नाटकाचा प्रयोग सादर करणार असल्याची माहिती दामले यांनी दिली आहे.