"मी पंकज कपूर यांचा मुलगा आहे, पण इंडस्ट्रीत एकटा लढलो", शाहिद कपूर स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:03 IST2025-12-02T18:02:28+5:302025-12-02T18:03:08+5:30
Shahid Kapoor On Nepotism : स्टार किड्सना इंडस्ट्रीमध्ये सहज प्रवेश मिळतो, असे अनेकदा म्हटले जाते. पण हे पूर्ण सत्य नाही, कारण नेपोटिझमच्या या यादीत शाहिद कपूर बसत नाही. वडिलांमुळे आपल्याला कधीही काम मिळाले नाही, असे त्याने सांगितले.

"मी पंकज कपूर यांचा मुलगा आहे, पण इंडस्ट्रीत एकटा लढलो", शाहिद कपूर स्पष्टच बोलला
बॉलिवूडचा 'कबीर सिंग' म्हणजेच अभिनेता शाहिद कपूर हा सर्वात हॅण्डसम अभिनेत्यांपैकी एक आहे. 'इश्क विश्क', 'जब वी मेट', 'हैदर', 'पद्मावत', 'कबीर सिंग', 'ब्लडी डॅडी', 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' आणि 'देवा' यांसारख्या चित्रपटांतून त्याने बॉलिवूडला दमदार चित्रपट दिले आहेत. परंतु, सिनेइंडस्ट्रीमध्ये त्याचे वडील आणि दिग्गज अभिनेते पंकज कपूर यांच्यामुळे एंट्री घेतली नाही, हे त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. आपल्या वडिलांनी कधीही फोन करून आपल्याला काम मिळवून दिले नाही, असे त्याने सांगितले.
स्टार किड्सना इंडस्ट्रीमध्ये सहज प्रवेश मिळतो, असे अनेकदा म्हटले जाते. पण हे पूर्ण सत्य नाही, कारण नेपोटिझमच्या या यादीत शाहिद कपूर बसत नाही. वडिलांमुळे आपल्याला कधीही काम मिळाले नाही, असे त्याने सांगितले. अलीकडेच 'पंजाब फर्स्ट व्हॉईस' पॉडकास्टमध्ये शाहिदने मनमोकळा संवाद साधला. तो म्हणाला, "मी पंकज कपूर यांचा मुलगा असल्यामुळे अभिनेता झालो, असे लोकांना वाटते. पण माझ्या आई-वडिलांचा मी फक्त तीन वर्षांचा असताना घटस्फोट झाला होता. मी वडिलांसोबत फार कमी वेळ घालवला, त्यामुळे मी त्यांचा मुलगा आहे हे कोणाला माहीतही नव्हते. ना मी कधी त्यांच्या नावाचा वापर केला. मी माझ्या आईसोबत राहिलो. गोष्टी माझ्यासाठी आपोआप जुळून आल्या. मी कधीच वडिलांकडे मदत मागितली नाही आणि त्यांनीही कधी माझ्यासाठी काम मिळवून देण्यासाठी कोणाला फोन केले नाहीत."
घटस्फोटानंतर आईने एकटीनं सांभाळलं
आई-वडिलांच्या घटस्फोटाच्या वेदनेबद्दलही शाहिदने यावेळी सांगितले. तो म्हणाला, "माझे आई-वडील वेगळे झाले, तेव्हा मी खूप लहान होतो, पण ती पोकळी जाणवते. मी लहान होतो, तरी ती उणीव जाणवायची. आज अनेक मुले त्यातून जातात, त्यांना हे समजू शकते." त्याने सांगितले की, "माझी आई नीलिमा अझीम यांनी मला एकट्याने वाढवले. त्यांनी मला शिकवले, वाढवले आणि अभिनेता बनवले." आता शाहिद स्वतः एक पिता आहे. मीरा राजपूतशी लग्न केल्यानंतर त्यांना मीशा नावाची मुलगी आणि झेन नावाचा मुलगा आहे. शाहिद म्हणाला, "घरी येताच मी कामाचा सगळा ताण बाहेर सोडून देतो. फक्त मुलगा, नवरा आणि वडील ही भूमिका निभावतो."
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, शाहिद याच वर्षी ३१ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या 'देवा' या ॲक्शन चित्रपटात दिसला होता. रोशन अँड्र्यूज दिग्दर्शित या चित्रपटात तो पोलीस अधिकारी बनला होता आणि पूजा हेगडे त्याची नायिका होती. सध्या तो विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. हा त्याचा विशालसोबतचा चौथा चित्रपट असेल. या चित्रपटात तृप्ती डिमरी, नाना पाटेकर, रणदीप हुडा आहेत आणि विक्रांत मेस्सी स्पेशल अपिअरन्समध्ये दिसणार आहे. यासोबतच तो 'कॉकटेल २'मध्ये क्रिती सनॉन आणि रश्मिका मंदानासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.