"अक्षय खन्नाला ऑस्कर दिला पाहिजे...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर फराह खानची पोस्ट, अभिनेत्याने साकारलेला रहमान डकैत पाहून झाली थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:02 IST2025-12-09T11:01:18+5:302025-12-09T11:02:15+5:30
अक्षय खन्नाने 'धुरंधर'मध्ये पाकिस्तानातील कराचीमधील कुख्यात गुंड असलेल्या रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नाने साकारलेला रहमान डकैत खुंखार आहे. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

"अक्षय खन्नाला ऑस्कर दिला पाहिजे...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर फराह खानची पोस्ट, अभिनेत्याने साकारलेला रहमान डकैत पाहून झाली थक्क
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अॅक्शन थ्रिलर असलेला 'धुरंधर' सिनेमा अखेर शुक्रवारी(५ डिसेंबर) सर्वत्र प्रदर्शित झाला. रणवीर सिंग, आर माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेरांच्या गुप्त कारवायांवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमातून मेजर मोहित शर्मा या डॅशिंग लष्करी अधिकाऱ्याची कहाणी आणि कामगिरी दाखवण्यात आली आहे. 'धुरंधर' सिनेमात रणवीर सिंगने मेजर मोहित शर्मा यांची भूमिका साकारली आहे. रणवीर सिंगच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण, रणवीरसोबतच सिनेमात अभिनेता अक्षय खन्ना भाव खाऊन गेला आहे.
अक्षय खन्नाने 'धुरंधर'मध्ये पाकिस्तानातील कराचीमधील कुख्यात गुंड असलेल्या रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नाने साकारलेला रहमान डकैत खुंखार आहे. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अक्षय खन्नाने रहमान डकैतच्या व्यक्तिरेखेचे बारकावे त्याच्या भूमिकेतून दाखवले आहेत. फराह खानही 'धुरंधर' पाहिल्यानंतर थक्क झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अक्षय खन्नाचं कौतुक केलं आहे. फराहने एक रील शेअर केलं आहे. यामध्ये अक्षय खन्नाचा 'धुरंधर' सिनेमातील एक सीन आहे. "'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाला रहमान डकैतची भूमिका साकारताना पाहून प्रत्येक जण...", असं कॅप्शन आहे. ही रील शेअर करत फराह खान म्हणते, "अक्षय खन्नाला खरंच ऑस्कर दिला पाहिजे".

दरम्यान, 'धुरंधर' सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य धारने केलं आहे. या सिनेमाचा दुसरा भाग मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवरही 'धुरंधर' सिनेमा चांगली कमाई करत आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत १२६ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर अक्षय खन्नाचा हा या वर्षातील दुसरा बेस्ट परफॉर्मन्स आहे. याआधी छावा मध्ये साकारलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं.