"अख्खा सिनेमा मी केला पण तू...", झीशान अय्यूबच्या कॅमिओवर धनुषची प्रतिक्रिया चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 11:15 IST2025-12-02T11:12:15+5:302025-12-02T11:15:04+5:30
'तेरे इश्क मे' सिनेमातील झीशान अय्यूबचा सीन प्रेक्षकांच्या काळजाला भिडला आहे.

"अख्खा सिनेमा मी केला पण तू...", झीशान अय्यूबच्या कॅमिओवर धनुषची प्रतिक्रिया चर्चेत
धनुष आणि क्रिती सेननचा 'तेरे इश्क मे' रिलीज झाला आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या सिनेमाने पुन्हा 'रांझणा' या सुपरहिट सिनेमाच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.'तेरे इश्क मे' मध्येही टॉक्झिक लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. धनुष आणि क्रितीची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. मात्र सिनेमातील झिशान अय्युबच्या कॅमिओने भावच खाल्ला आहे. धनुषही त्या सीनमध्ये फिका पडताना दिसतो. नुकतंच धनुषनेही झिशानच्या कॅमिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
'तेरे इश्क मे'मध्ये झिशान अय्युबचा कॅमिओ आहे. वाराणसीतील मणिकर्णिका घाटावरचा तो सीन आहे. सिनेमात तो 'रांझणा'मधल्या मुरारीच्या भूमिकेत असतो. धनुष म्हणजेच शंकरशी बोलताना तो आपला जुना मित्र कुंदनची आठवण काढतो. यावेळी रांझणाचं भावुक म्युझिकही बॅकग्राऊंडला वाजतं. तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यात आपसूक पाणी येतं.
'अमर उजाला'ला दिलेल्या मुलाखतीत झीशान अय्यूब म्हणाला, "खरं सांगायचं तर लोकांचं प्रेम पाहून खूप छान वाटत आहे. सतत मेसेज आणि फोन येत आहेत. मलाही रांझणा सिनेमाच्या वेळची आठवण झाली. जेव्हा मी रांझणा केला होता तेव्हाही मला असाच प्रतिसाद मिळाला होता. आज इतक्या वर्षांनी प्रेक्षकांचं पुन्हा तेवढंच प्रेम मिळत आहे. मी तर म्हणेन यावेळी जास्त प्रेम मिळतंय. मी खूप खूष आणि आभारी आहे."
धनुषसोबतच्या मैत्रीबद्दल तो म्हणाला, "आम्ही मित्र नाही तर भाऊच आहोत. मगाशीच त्याला मला फोन आला. तो म्हणाला की अख्खा सिनेमा मी केला आणि तू फक्त एक सीन केला. पण लोक तुझीच जास्त स्तुती करत आहेत. शूटवेळी जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा आम्ही एकमेकांना मिठी मारली. बराच वेळ आम्ही एकमेकांना धरुन होतो. इतक्या वर्षांनंतर आमची भेट झाली होती त्यामुळे डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तो भावुक क्षण पाहून आनंद एल रायही लगेच म्हणाले की हा सीन नक्की हिट होणार आणि तेच झालं. त्या सीनमधून मुरारीची भूमिका पुन्हा जिवंत झाली. तो सीन थेट प्रेक्षकांच्या काळजाला भिडला. "