व्ही. शांताराम यांच्या बायोपिकमध्ये दुसऱ्या पत्नीची भुमिका कोण साकारणार, पहिली झलक आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:31 IST2025-12-09T13:30:29+5:302025-12-09T13:31:06+5:30
व्ही. शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी जयश्री यांची भुमिका 'ही' अभिनेत्री साकारणार, पहिली झलक आली समोर

व्ही. शांताराम यांच्या बायोपिकमध्ये दुसऱ्या पत्नीची भुमिका कोण साकारणार, पहिली झलक आली समोर
V Shantaram Biopic : मराठी सिनेसृष्टी सोबतच संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणारे व्यक्तिमत्व शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम. बाबुराव पेंटर त्यांच्या फिल्म स्टुडिओ मधून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्यांनी स्वतःची राजकमल फिल्म कंपनी सुरू केली. लवकरच भारतीय चित्रपटाचे गेमचेंजर असलेले व्ही. शांताराम यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'व्ही. शांताराम' हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या महत्त्वाकांक्षी चित्रपटात व्ही. शांताराम यांची भुमिका अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी साकारणार आहे. आता या चित्रपटातील आणखी एका मोठ्या भूमिकेचा खुलासा निर्मात्यांनी केला आहे.
'व्ही. शांताराम' या बायोपिकमध्ये अभिनेत्री तमन्ना भाटिया हिची एन्ट्री झाली आहे. ती दिग्गज अभिनेत्री जयश्री यांची भुमिका साकारणार आहे. व्ही. शांताराम यांची सहकलाकार ते सहचारिणी असा प्रवास या व्यक्तिरेखेतून उलगडणार आहे. तमन्नाचा जयश्री यांच्या भूमिकेतील फर्स्ट लूक समोर आला आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये तमन्ना एका आकर्षक गुलाबी नऊवारी साडीत खूप सुंदर दिसतेय.
जयश्री यांची भूमिकेबद्दल तमन्ना भाटिया म्हणाली, "भारतीय सिनेमाच्या इतक्या महत्त्वपूर्ण काळातील अशा एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाला पडद्यावर उतरवणे, माझ्यासाठी अत्यंत मोठी जबाबदारी आहे. हा माझ्यासाठी अत्यंत आदराचा क्षण आहे. त्यांच्याकडे असलेली कला खरंच अविश्वसनीय होती. व्ही. शांताराम यांनी जो वारसा निर्माण केली, तो आजही अनेकांना प्रेरणा देतो. त्यांचं विश्व समजून घेताना महान व्यक्तिमत्वाचं तेज जाणवतं. त्या वारशाचा एक अंश जरी मी पडद्यावर उभारू शकले, तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. 'जयश्री' यांच्या भुमिकेसाठी माझी निवड केल्याबद्दल निर्मात्यांची मनापासून आभारी आहे".
व्ही. शांताराम यांनी वयाच्या २०व्या वर्षी १९२१ मध्ये १२ वर्षांच्या विमलाबाईसोबत संसार थाटला. पण पुढे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान देखणे, रुबाबदार व्ही. शांताराम जयश्री कामलकर यांच्या प्रेमात पडले. शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली आणि १९४१ मध्ये त्यांनी लग्न केलं. विशेष म्हणजेत्यावेळी हिंदू मॅरेज ॲक्ट अस्तित्वात नसल्यामुळे पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच त्यांनी दुसरा संसार थाटलेला. दोघं आपल्या व्यवसायिक आयुष्यात प्रगती करत असतानाच मात्र लोक त्यांना टोमणे मारू लागलेले. व्ही. शांताराम या विवाहित पुरुषासोबत लग्न केल्याने जयश्री यांना अनेकांनी हिणवलं. त्यामुळे त्या मानसिकरित्या खचल्या. जयश्री यांच्यासोबतच लग्न पंधरा वर्ष सुखाने चाललेलं. पण नंतर त्यांच्यात खटके उडू लागलेले. त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात अभिनेत्री संध्या देशमुख यांनी प्रवेश केला. या दोघांच्या जवळीकीच्या चर्चा जयश्री यांच्यापर्यंत पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी व्ही शांताराम यांच्यासोबत घटस्फोट घेतला कारण त्यावेळी हिंदू मॅरेज ॲक्ट अस्तित्वात आला होता.