Indigo Crisis: इंडिगोच्या गोंधळामुळे इतर एअरलाईन्सच्या तिकीट दरात मोठी वाढ; सोनू सूद संतापला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 13:08 IST2025-12-07T12:49:13+5:302025-12-07T13:08:34+5:30
अभिनेत्यानं ग्राउंड स्टाफची बाजू घेत प्रवाशांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे.

Indigo Crisis: इंडिगोच्या गोंधळामुळे इतर एअरलाईन्सच्या तिकीट दरात मोठी वाढ; सोनू सूद संतापला!
Sonu Sood On Indigo Crisis : इंडिगो एअरलाईन्सच्या (Indigo Airlines) बिघडलेल्या वेळापत्रकाचा देशातील हवाई प्रवासावर गंभीर परिणाम झाला आहे. काही उड्डाणांचे वेळापत्रक दिवसभरात अनेकदा बदलण्यात आले, त्यामुळे प्रवासी पूर्णपणे गोंधळून गेल्याचे पाहायला मिळाले. या परिस्थितीत इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. अनेक लोकप्रिय मार्गावरील भाडे प्रचंड वाढले आहेत. या परिस्थितीत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं एअरलाईन्सच्या भाडेवाढीवर संताप व्यक्त केलाय. तसेच अभिनेत्यानं ग्राउंड स्टाफची बाजू घेत प्रवाशांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे.
सोनू सूदने X वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, "युद्ध असो किंवा संकट, आवश्यक गोष्टींच्या किंमती वाढवणे म्हणजे शोषणच आहे. हेच एअरलाईन्ससाठीही लागू होतं. ऑपरेशनल अडचणी असताना तिकीट दर पाच ते दहा पट वाढवणे अतिशय चुकीचे आहे. सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दरांवर कडक मर्यादा असायला हव्यात. त्याही जास्तीत जास्त दीड ते २ पटीपर्यंत असायला हव्यात".
सोनू सूदने प्रवाशांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्याने स्वतःच्या कुटुंबालाही झालेल्या त्रासाचा अनुभव सांगितला. व्हिडीओमध्ये तो म्हणाला, "इंडिगोच्या समस्या गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरु आहेत. माझं कुटुंब प्रवास करत होतं, त्यांनाही सुमारे साडेचार ते पाच तास वाट पाहावी लागली. तासन्तास थांबावं लागलं. अनेक विमाने उड्डाण घेऊ शकली नाहीत, अनेक रद्द झाली. त्यामुळे लोक लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. अनेकांचे कार्यक्रम रद्द झाले. लोक खूप त्रासलेत, हे खरं आहे. पण लोकांना विमानतळ कर्मचाऱ्यांवर ओरडताना पाहणे दुःखद गोष्ट आहे".
"A delayed flight is frustrating, but remember the faces trying to fix it. Please be nice and humble to the IndiGo staff; they are carrying the weight of cancellations too. Let’s support them." @IndiGo6Epic.twitter.com/rd3ciyekcS
— sonu sood (@SonuSood) December 6, 2025
सोनू सूदने प्रवाशांना कर्मचाऱ्यांच्या भूमिकेत स्वतःला ठेवून पाहण्याचे आवाहन केले. तो म्हणाला, "प्रवाशांमध्ये राग आहे, हे मी समजतो. पण थोडं त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघा. ते असहाय्य आहेत. पुढे काय शेड्यूल आहे, त्यांनाही माहित नसतं. उच्चपदस्थांकडून येणारा मेसेज ते फक्त प्रवाशांना सांगतात. हे तेच कर्मचारी आहेत, जे रोज आपली काळजी घेतात. त्यामुळे अशा संकटात त्यांच्या पाठिशी राहणं ही आपली जबाबदारी आहे".