"मी माफी मागतो..."; 'कांतारा'च्या ऋषभ शेट्टीची नक्कल केल्यानंतर रणवीरची पोस्ट, म्हणाला- "माझा हेतू फक्त..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 11:51 IST2025-12-02T11:51:07+5:302025-12-02T11:51:27+5:30
कांताराच्या ऋषभ शेट्टीची वाईट नक्कल केल्यामुळे रणवीरवर टीकेची झोड उठली. आता अभिनेत्याने पोस्ट लिहून माफी मागितली आहे

"मी माफी मागतो..."; 'कांतारा'च्या ऋषभ शेट्टीची नक्कल केल्यानंतर रणवीरची पोस्ट, म्हणाला- "माझा हेतू फक्त..."
काही दिवसांपूर्वी गोव्याच्या इफ्फी फिल्म फेस्टिव्हलमध्ये रणवीर सिंग सहभागी झाला होता. त्यावेळी रणवीरने ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चाप्टर १' सिनेमाचा उल्लेख करुन त्याची नक्कल केली. 'कांतारा चाप्टर १' सिनेमात ऋषभच्या अंगात जेव्हा देवीचा संचार होतो, त्याचा उल्लेख रणवीरने भूत म्हणून केला होता. याशिवाय अत्यंत विचित्र पद्धतीने रणवीरने सर्वांसमोर त्या प्रसंगाची नक्कल केली होती. अखेर आता रणवीरने या संपूर्ण प्रकरणाविषयी माफी मागितली आहे.
रणवीरचा माफीनामा
रणवीर सिंगने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करुन लिहिलंय की, ''माझा हेतू 'कांतारा' सिनेमातील ऋषभच्या अविश्वसनीय अभिनयाची दखल घेणं हा होता. एक अभिनेता म्हणून, मला माहीत आहे की, त्याने ज्या पद्धतीने तो विशिष्ट प्रसंग सादर केला, त्यासाठी त्याला किती मेहनत घ्यावी लागली असेल आणि म्हणूनच माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर आहे. मी नेहमीच आपल्या देशातील प्रत्येक संस्कृतीचा, परंपरेचा आणि श्रद्धेचा मनापासून आदर केला आहे. कोणाच्याही भावना दुखावल्या असल्यास, मी नम्रपणे माफी मागतो.''
रणवीरने काय केलं होतं?
नुकतंच गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये रणवीर सिंहनेही हजेरी लावली. त्याच्या आगामी 'धुरंधर' सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो आला होता. यावेळी त्याने समोर बसलेल्या ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'ची स्तुती केली. याशिवाय त्याने ऋषभच्या अभिनयाचीही स्तुती केली. मात्र त्याने देवीच्या जागी भूत असा उल्लेख केला आणि ऋषभची नक्कलही केली ज्यावर लोक भडकले. अखेर आता रणवीरने माफी मागितल्याने या वादग्रस्त प्रकरणावर पडदा पडला आहे.
