Dhurandar Box Office: 'धुरंधर' सिनेमाची दोन दिवसात रेकॉर्डब्रेक कमाई; बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 08:58 IST2025-12-07T08:57:58+5:302025-12-07T08:58:45+5:30
Dhurandar Box Office Collection: रणवीर सिंग, अक्षय खन्नाच्या धुरंधर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करुन सर्वांना थक्क करुन सोडलंय

Dhurandar Box Office: 'धुरंधर' सिनेमाची दोन दिवसात रेकॉर्डब्रेक कमाई; बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून थक्क व्हाल
अभिनेता रणवीर सिंग, संजय दत्त, आणि अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित स्पाय थ्रिलर चित्रपट 'धुरंधर' (Dhurandhar) बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या जबरदस्त कलेक्शननंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी कमाईचा विक्रम मोडला आहे.
पहिला दिवस आणि दुसऱ्या दिवसाची कमाई
दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या चित्रपटाने ओपनिंग डेला अपेक्षेप्रमाणे दमदार कामगिरी केली होती. Sacnilk च्या माहितीनुसार, 'धुरंधर'ने पहिल्या दिवशी २७ कोटी रुपयांचे शानदार कलेक्शन केले होते. मात्र, वीकेंडचा फायदा घेत, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी वाढ दिसून आली. 'धुरंधर'ने दुसऱ्या दिवशी ३१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
या दमदार कलेक्शनमुळे, पहिल्या दोन दिवसांत 'धुरंधर'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण ५८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दुसऱ्या दिवशी ३१ कोटींची कमाई करून 'धुरंधर'ने ओपनिंग डेचा (२७ कोटी) विक्रम मोडला आहे.
सर्वात मोठी ओपनिंग देणारा तिसरा चित्रपट
पहिल्या दिवसाच्या २७ कोटींच्या कलेक्शनसह, 'धुरंधर' चित्रपट 'छावा' (३१ कोटी) आणि 'वॉर २' (२९ कोटी) नंतर तिसरी सर्वात मोठी ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे. फक्त भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही 'धुरंधर'ने धमाकेदार सुरुवात केली आहे.
Sacnilk नुसार, ओपनिंग डेला भारताबाहेर या चित्रपटाने १३ कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे पहिल्या दिवशी चित्रपटाचे एकूण जागतिक कलेक्शन ४० कोटी रुपये झाले होते. आदित्य धर यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनामुळे आणि रणवीर सिंगच्या अभिनयामुळे 'धुरंधर'ला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.