"मी थकून गेलो आहे..."; बोमन इराणींची पोस्ट व्हायरल; सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्याचे दिले संकेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 14:05 IST2025-12-09T14:04:03+5:302025-12-09T14:05:59+5:30
बोमन इराणी बॉलिवूडमधून ब्रेक घेणार का, अशी चर्चा रंगली आहे. बोमन इराणींची पोस्ट सध्या व्हायरल झाली असून चाहत्यांना चिंता आहे

"मी थकून गेलो आहे..."; बोमन इराणींची पोस्ट व्हायरल; सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्याचे दिले संकेत?
बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते बोमन इराणी हे त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. अशातच बोमन इराणी यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक गूढ पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे त्यांचे चाहते मात्र चिंतेत पडले आहेत. बोमन इराणी सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार का, असा प्रश्न यामुळे सर्वांना पडला आहे. जाणून घ्या काय म्हणाले बोमन इराणी.
बोमन यांची इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट व्हायरल
बोमन इराणी यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ''आयुष्यात सर्वकाही 'डेजा वू' (déjà vu) सारखे वाटू लागले आहे. म्हणजेच, जणू पूर्वी ज्या घटना घडल्या आहेत, तसंच काहीसं पुन्हा घडत आहे. तेच जुनं कथानक, खूप जास्त ड्रामा. प्रामाणिकपणे सांगायचं तर, मला वाटतं की, मी माझी मर्यादा गाठली आहे. मी थकून गेलो आहे.”
"कदाचित थोड्या काळासाठी दूर जाण्याची ही योग्य वेळ आहे. कोणताही गोंधळ नाही, कोणताही ड्रामा नाही. मी ठीक आहे, फक्त थोडी विश्रांती हवी आहे. हे केवळ माझे विचार आहेत, त्यातून जास्त अर्थ काढू नका,” असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बोमन इराणी सिनेसृष्टीतून काही काळासाठी ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
नवीन चित्रपटामुळे चर्चेत
दुसरीकडे बोमन इराणी सध्या प्रभास यांच्या आगामी 'द राजा साब' हॉरर कॉमेडी चित्रपटातील भूमिकेमुळे ते नुकतेच चर्चेत आले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त २ डिसेंबर रोजी या चित्रपटाचे एक खास पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या चित्रपटात ते एका सायकोलॉजिस्टच्या भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान बोमन इराणी यांची ही पोस्ट सध्या व्हायरल झाल्याने त्यांच्या कारकीर्दीतून ते काही वेळासाठी विश्रांती घेणार का? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.