अभिनयानंतर राजकारणात येणार? माधुरी दीक्षितने स्पष्टच सांगितलं, म्हणाली-"मी स्वत:ला…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:13 IST2025-12-02T12:09:26+5:302025-12-02T12:13:59+5:30
बॉलिवूड गाजवल्यानंतर माधुरी दीक्षित राजकीय क्षेत्रात घेणार एन्ट्री? 'त्या' चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन

अभिनयानंतर राजकारणात येणार? माधुरी दीक्षितने स्पष्टच सांगितलं, म्हणाली-"मी स्वत:ला…"
Madhuri Dixit: बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित लाखो चाहत्यांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवतेय. माधुरी दीक्षित एक उत्तम अभिनेत्री असण्याोबतच ती एक उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. माधुरीबरोबर काम करणं हे त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांचं स्वप्न असायचं. सध्या माधुरी तिचा आगामी चित्रपट मिसेस देशपांडेमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती ओटीटी विश्वात पाऊल ठेवते आहे. दरम्यान, गेल्या काही काळापासून माधुरी राजकारणात प्रवेश करणार अशी कुजबुज सुरू होती. 'मिसेस देशपांडे' या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत तिने यावर स्पष्ट शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मागील काही वर्षांपासून माधुरी राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चा जोर धरू लागल्या होत्या इतकंच नाही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माधुरी निवडणुक लढवणार असंही म्हटलं जात होतं. या सर्व चर्चांना पूर्णविराम देत अभिनेत्रीने तिचं मत व्यक्त केलं आहे. अलिकडेच एएनआय ला दिलेल्या मुलाखतीत राजकीय क्षेत्रात एन्ट्री घेणार असल्याचं अफवांचं खंडण केलं. अभिनेत्री म्हणाली,"मी आता काहीच सांगू शकत नाही. पण,मला वाटतं राजकारण हे माझं काम नाही. मी एक कलाकार आहे आणि कलाक्षेत्रातील काही बदल असतील त्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन. किंवा या क्षेत्रातील विविध गोष्टींबद्दल जनजागृती करण्याचं काम करेन. सध्या तरी मी स्वत: ला या भूमिकेत पाहते." असं स्पष्ट मत अभिनेत्रीने व्यक्त केल.
पुढे अभिनेत्री म्हणाली,"राजकारणात येणं हा माझा हेतू नाही. शिवाय एक कलाकार म्हणून जे काही मला करायचं आहे ते मी करु शकते. मी माझ्या या विश्वातच बरी आहे. राजकारणापेक्षा मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं." असंही माधुरीने सांगितलं.