दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 11:41 IST2025-11-14T11:40:43+5:302025-11-14T11:41:27+5:30
हे कधीच होणार नाही! कारण...; अजिंक्य देव यांनी मांडलं मत

दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
येत्या दीड वर्षात सिनेमा बंद पडेल असं वक्तव्य दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकरांनी केलं होतं. त्यांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा नुकताच रिलीज झाला. सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी अनेक मुलाखती दिल्या. प्रत्येक मुलाखतीत त्यांनी येत्या दीड वर्षात सिनेमा बंद पडेल असं वक्तव्य केलं. एआय जितकं प्रगत होतंय तितका आपल्याला धोका आहे असं ते म्हणाले होते. आता यावर अभिनेते अजिंक्य देव यांनी असहमती दर्शवली आहे.
अमोल परचुरे यांच्या 'कॅचअप'ला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य देव म्हणाले, "एआयने आज सगळं व्यापून टाकलं आहे. अनेकांच्या नोकऱ्याही एआयमुळे चालल्या आहेत हे आपण वाचतोच आहोत. दीड-दोन वर्षात सिनेमा बंद होईल असं कोणीतरी बोललं. पण हे कधीच होणार नाही. एआय अशी किती आपली जागा घेईल यालाही एक मर्यादा आहे. ही मर्यादा पार व्हायला कदाचित ५०-६० वर्ष जातील. तोवर आपणही प्रगत झालेलो असू."
मराठी सिनेसृष्टीबद्दल ते म्हणाले, "आपला एकच प्रॉब्लेम आहे. आपण एक नाही आहोत. जरी भाषा एकच असली तरी प्रत्येकामध्ये स्पर्धेचं वातावरण आहे. स्पर्धा असावी पण दुसऱ्यांवर पाय देऊन स्वत: पुढे जायचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. एकमेकांना धरुन एकत्र जर पुढे गेलात तर अख्खी इंडस्ट्रीही वाढेल नाहीतर एखादा कंपूच वाढेल. आपण आधीच इतके छोटे आहोत कारण आपल्याला हिंदी आणि इतर भाषिक लोकांशी स्पर्धा करायची आहे. आपल्याला आधीच क्रश केलं आहे. त्यामुळे जर कंपू बनवले तर आपण पुढे कसे जाणार?"
अजिंक्य देव सध्या सिनेसृष्टीत अॅक्टिव्ह झाले आहेत. मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये ते काम करत आहेत. फरहान अख्तरच्या आगामी '१२० बहादुर' सिनेमात ते दिसणार आहेत. शिवाय तेजश्री प्रधानसोबतही त्यांचा 'असा मी अशी मी' हा मराठी सिनेमा येणार आहे. यामध्ये अजिंक्य आणि तेजश्रीची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.