World Wildlife Day : गवे, हत्ती, वाघांसाठी ओळखले जाते कोल्हापूरचे वनवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 12:11 PM2021-03-03T12:11:53+5:302021-03-03T12:17:27+5:30

wildlife Kolhapur- कोल्हापूर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात अनेक वन्यजीवांचे वास्तव्य आहे. यामध्ये वन्यप्राणी, वन्यपक्षी, सरपटणाऱ्या प्राण्यांचाही समावेश आहे. वाघ, हत्ती, गवा, फुलपाखरांसाठी हे वनक्षेत्र ओळखले जाते. वनस्पतींनाही वन्यजीव म्हणून मानले गेले असले तरी अद्याप या क्षेत्रातील दुर्मिळ वन्य वनस्पतींची गणना झालेली नाही. संरक्षित क्षेत्रातील वन्यजीवांची नोंद असली तरी त्याबाहेरील वन्यजीवांचीही गणना होण्याची गरज आहे.

World Wildlife Day: Kolhapur is known for its cows, elephants and tigers | World Wildlife Day : गवे, हत्ती, वाघांसाठी ओळखले जाते कोल्हापूरचे वनवृत्त

World Wildlife Day : गवे, हत्ती, वाघांसाठी ओळखले जाते कोल्हापूरचे वनवृत्त

googlenewsNext
ठळक मुद्देजागतिक वन्यजीव दिवस : गवे, हत्ती, वाघांसाठी ओळखले जाते कोल्हापूरचे वनवृत्तविविध वन्यजीवांचे वास्तव्य : गणना होण्याची गरज

संदीप आडनाईक


कोल्हापूर : कोल्हापूर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात अनेक वन्यजीवांचे वास्तव्य आहे. यामध्ये वन्यप्राणी, वन्यपक्षी, सरपटणाऱ्या प्राण्यांचाही समावेश आहे. वाघ, हत्ती, गवा, फुलपाखरांसाठी हे वनक्षेत्र ओळखले जाते. वनस्पतींनाही वन्यजीव म्हणून मानले गेले असले तरी अद्याप या क्षेत्रातील दुर्मिळ वन्य वनस्पतींची गणना झालेली नाही. संरक्षित क्षेत्रातील वन्यजीवांची नोंद असली तरी त्याबाहेरील वन्यजीवांचीही गणना होण्याची गरज आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी आणि दाजीपूर या दोन मोठ्या अभयारण्यासोबत कोल्हापूर वनवृत्तात प्रामुख्याने कोयना, चांदोली, राधानगरी, तिलारी ते आंबोलीपर्यंतचा सलग एकूण ८६ हजार ५५४ हेक्टरच्या वनक्षेत्राचा समावेश आहे. या वनक्षेत्रात अनेक दुर्मिळ वन्य वनस्पतींची नोंद आहे. दुर्दैवाने याची अधिकृत नोंद वनविभागाकडे नाही.

वन्यप्राणी, वन्य पक्ष्यांप्रमाणेच सपुष्प वन्य वनस्पतींचीही वन्यजीव म्हणून स्वतंत्र गणना केली पाहिजे, असे मत पर्यावरण अभ्यासक डॉ. मधुकर बाचूळकर यांनी व्यक्त केले. आपल्याकडील अनेक नैसर्गिक अधिवासांचा अभ्यास केला गेला तर त्याचे संवर्धन होण्यास मदत होईल असे मत सरिसृप अभ्यासक वरद गिरी यांनी व्यक्त केले आहे.

३६ प्रकारच्या वन्यप्राण्यांची नोंद

राधानगरी अभयारण्यात सुमारे ३६ प्रकारच्या वन्यप्राण्यांची नोंद आहे. यामध्ये वाघ, हत्ती, बिबट्या, लहान हरिण, रानकुवा, अस्वल, गवा, सांबर, भेकर, चौसिंगा, रानडुक्कर, मार्जार कुळातील साळिंदर, पानमांजर, उदमांजर, खवले मांजर, वाघाटी, लंगूर याबरोबरच शेकरू , कासवे आणि वटवाघळाच्या प्रजातींचा समावेश आहे. शिवाय अंबोलीत पानमांजर आणि तिलारीत लाजवंती या वनमानवाच्या वन्यजीवांचा समावेश आहे.

२३५ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद

राधानगरी अभयारण्य क्षेत्रात २३५ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद आहे. तीन प्रकारची गिधाडे येथे वास्तव्यास आहेत. जगात फक्त पश्चिम घाटात आढळणाऱ्या पक्ष्यांपैकी १0 प्रजातींचे पक्षी येथे आढळतात. यामध्ये शेकरू, निळ्या शेपटीचा पोपट आणि हॉर्नबिलच्या चारही प्रजातींचा समावेश आहे.

१३५ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद

राधानगरी अभयारण्यात १३५ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद आहे. सदर्न बर्डविंग हे भारतातील सर्वांत मोठे फुलपाखरू (१९0 मि.मी.) असून १५ मि.मी.चे ग्रास ज्युवेल हे सर्वांत लहान फुलपाखरूही या अभयारण्यात आढळते. हजारोंच्या संख्येने एकत्र जमून स्थलांतर करणारी ब्ल्यू टायगर, ग्लोसी टायगर, स्ट्राइप टायगर ही फुलपाखरे याठिकाणी येथे पाहायला मिळतात.

२८ प्रकारचे उभयचर, १00 प्रकारचे सरिसृप

सरिसृप गटात राधानगरी अभयारण्य आणि अंबोली, तिलारी परिसरात वेगवेगळ्या जातींच्या पाली, सरडे, साप-सुरळी, देवगांडूळ, उभयचर प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे बेडूक येथे भेटतात. २८ प्रकारचे उभयचर आणि १00 प्रकारचे सरिसृप येथे आढळतात. पालीच्या नव्या प्रजातीची पहिली नोंद राधानगरीत झाली आहे. कोल्हापुरी पाल आणि अंबोली पाल इतरत्र पाहायला मिळत नाही. अभयारण्यात ३३ प्रकारच्या सापांची नोंद आहे. ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक, एरिक्स व्हिटेकरी, पाइडबेली शिल्डटेड या सापांची नोंद येथे झाली आहे. खैरेंचा खापरखवल्या हा विशिष्ट साप येथेच आढळतो.

तीन वाघांची अधिकृत नोंद

चांदोली आणि कोयना परिसरात चार, तिलारीत दोन व राधानगरी परिसरात एका वाघाचे अस्तित्व आढळल्याचे अभ्यासक सांगतात, असे असले तरी २०१४ मधील गणनेनुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन वाघ आढळल्याच्या नोंदी आहेत. पर्यावरण, वन्यजीव अभ्यासकांच्या मते, ही संख्या पाचपर्यंत असल्याचे सांगितले जात असले तरी तशा अधिकृत नोंदी नाहीत.

Web Title: World Wildlife Day: Kolhapur is known for its cows, elephants and tigers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.