अकोल्यातील मोर्णा नदी नव्हे, डासांचे उत्पत्ती केंद्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 01:00 PM2019-12-20T13:00:02+5:302019-12-20T13:01:35+5:30

पाण्याचा वापर ना शेतीसाठी, ना पिण्यासाठी

Morna is no more a River in Akola, it became the mosquito breeding center! | अकोल्यातील मोर्णा नदी नव्हे, डासांचे उत्पत्ती केंद्र!

अकोल्यातील मोर्णा नदी नव्हे, डासांचे उत्पत्ती केंद्र!

googlenewsNext
ठळक मुद्देअकोल्याचे सांडपाणी थेट नदीत 

- सदानंद सिरसाट

अकोला : शहरातील सांडपाणी थेट मोर्णा नदीत सोडले जाते. त्यामुळे जलचरांना धोका निर्माण झाला असून, नदीलाप्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरातील मोठ्या पुलाखालील पाण्याचा नमुना सर्वाधिक प्रदूषित असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आधीच दिला आहे. या पाण्याचा वापर ना शेतीसाठी केला जातो, ना पिण्यासाठी. त्यामुळे ही नदी म्हणजे केवळ डासांचे उत्पत्ती केंद्र होऊन बसली आहे. 

शहराची पाण्याची गरज महान येथील काटेपूर्णा धरणातील साठ्यावर अवलंबून आहे. शहरापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या या धरणातून पाणी आणले जाते. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार अकोला शहराची लोकसंख्या ५ लाख ३८ हजार आहे. दैनंदिन ६.५० कोटी लिटर पाणी शहरासाठी लागते. त्यापैकी ३.५० कोटी लिटर पाणी सांडपाण्याच्या रूपात बाहेर पडते. या सांडपाण्याच्या शुद्धीकरणाची कोणतीही व्यवस्था अद्याप अस्तित्वात आलेली नाही. प्रदूषित पाणी शहरातील छोट्या नाल्यांतून थेट मोर्णा नदीत सोडले जाते. त्यामुळे अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला गटाराचे रूप आले आहे.  

सांडपाणी व्यवस्थापनासाठी शहरात भूमिगत गटार योजनेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यातील २५ टक्केही काम झालेले नाही. मलनिस्सारण वाहिन्यांचे कामही सुरू आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची निर्मिती शहरालगतच्या शिलोडा येथे केली जात आहे. प्रदूषित पाण्यासह शहरातील कचराही मोठ्या प्रमाणात नदीत फेकला जातो. त्याचाही दुष्परिणाम पाणी, त्यातील जलचर जिवांवर होत आहे. 

पाण्याचा उपयोगच नाही
अकोला शहरातून पुढे गेल्यानंतर कोणत्याही गावामध्ये मोर्णा नदीतील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही, तसेच सिंचनासाठीही ते वापरले जात नाही. सुकोडा गावातील काही शेतकरी नदीपात्रातील पाणी उपसा पद्धतीने पिकांना देतात. शहरापासून २०-२५ कि.मी. अंतरावर नदी कोरडी पडते.


शहरातील सांडपाणी व्यवस्थापन करून त्यावर नजीकच्या शिलोडा येथे प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. मार्चअखेरपर्यत काम पूर्ण होऊ शकते. प्रक्रिया केलेले पाणी पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र तसेच भोड येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला देण्याचे नियोजन आहे.    
-सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग, महापालिका

सांडपाण्यामुळे नदीच्या पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाले. त्यातून विषारी घटकांत वाढ झाली. त्यामुळे जैवविविधता नष्ट होते. नालीचे पाणी नदीत जाऊच नये, अशी व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. 
-डॉ. हरीश मालपाणी, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, रालतो महाविद्यालय, अकोला

Web Title: Morna is no more a River in Akola, it became the mosquito breeding center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.