CoronaVirus : महानगरांनी घेतला मोकळा श्वास; कोरोनाची आपत्ती प्रदूषण नियंत्रणात ठरली इष्टापत्ती

By गजानन दिवाण | Published: April 15, 2020 01:34 PM2020-04-15T13:34:48+5:302020-04-15T13:39:03+5:30

दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या पाहणीत ‘लॉकडाऊन’दरम्यान देशातील सर्वच महानगरांमधील प्रदूषण जवळपास ६१ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

CoronaVirus: Free breathing in metro cities; Corona disaster turned into pollution control | CoronaVirus : महानगरांनी घेतला मोकळा श्वास; कोरोनाची आपत्ती प्रदूषण नियंत्रणात ठरली इष्टापत्ती

CoronaVirus : महानगरांनी घेतला मोकळा श्वास; कोरोनाची आपत्ती प्रदूषण नियंत्रणात ठरली इष्टापत्ती

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे देशातील सर्वच शहरांमधील स्थिती सुधारत आहे.लॉकडाऊनमुळे ही शहरे माणसांना श्वास घेण्यासारखी झाली आहेत.

- गजानन दिवाण
औरंगाबाद : ‘कोरोना’ची आपत्ती प्रदूषण नियंत्रणासाठी इष्टापत्ती ठरली आहे. कुठल्याच कायद्याने, प्रदूषणामुळे जाणाऱ्या मृत्यूच्या भीतीने वा आर्थिक नुकसानीमुळे जे होऊ शकले नाही, ते ‘कोरोना’मुळे झाले. विषारी वायूमध्ये जगणाऱ्या दिल्ली, मुंबईसह देशभरातील सर्वच महानगरांनी मोकळा श्वास घेतला. देशभरातील ‘लॉकडाऊन’मुळे सर्वच महानगरांतील प्रदूषण जवळपास ६१ टक्क्यांनी कमी झाले.

दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या पाहणीत ‘लॉकडाऊन’दरम्यान देशातील सर्वच महानगरांमधील प्रदूषण जवळपास ६१ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे. मुंबईत पीएम (पर्टिक्युलेट मॅटर) २.५ स्तर ६१ टक्के कमी नोंदविला गेला. दिल्लीत २६ टक्के, कोलकात्यात ६० टक्के, तर बंगळुरूमध्ये १२ टक्के कमी नोंद झाली.

जगभरातील ५० अति प्रदूषित शहरांमध्ये भारतातील २५ शहरे असल्याची नोंद गतवर्षी ‘आयक्यूएअर’ या स्वीसमधील संस्थेने केली होती. उद्योगांमुळे, वाहनांमुळे आणि कोळसा प्रकल्पांमुळेच भारतात प्रदूषण वाढत असल्याचे ‘आयक्यूएअर’ने म्हटले होते. आज लॉकडाऊनमुळे देशातील सर्वच शहरांमधील स्थिती सुधारत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १३ एप्रिलच्या नोंदींनुसार नागपूर, भिवंडी, ठाणे, चंद्रपूर, आग्रा, दिल्ली, गुडगाव, गुवाहाटी,  इंदूर, पटणा या शहरांमधील प्रदूषणाची स्थिती सध्या सुधारत आहे. अहमदाबाद, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर या शहरांची स्थिती बरी आहे. अमृतसरमध्ये ठीक, तर बंगळुरू, लुधियाना, चेन्नई, औरंगाबाद आणि अमरावती या शहरांमधील प्रदूषणनियंत्रण चांगल्या स्थितीत आहे. मुंबईचा मार्च २०१९मध्ये एअर क्वालिटी इंडेक्स १५३ होता. म्हणजे आर्थिक राजधानी असलेले हे शहर माणसांना श्वास घेण्यायोग्य नव्हते. दिल्ली (एअर क्वालिटी इंडेक्स १६१)ची स्थिती तर यापेक्षा वाईट होती. लॉकडाऊनमुळे ही शहरे माणसांना श्वास घेण्यासारखी झाली आहेत.

- दिल्ली
 देशाची राजधानी दिल्लीत लॉकडाऊन आधीच्या तुलनेत पीएम १० चा स्तर ५१ टक्क्यांनी कमी, पीएम २.५ चा स्तर ४९ टक्क्यांनी, तर नायट्रोजन डायआॅक्साईड ३२ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

- मुंबई
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत लॉकडाऊन आधीच्या तुलनेत पीएम १० चा स्तर ४९ टक्क्यांनी कमी, पीएम २.५ चा स्तर ४५ टक्क्यांनी, तर नायट्रोजन डायआॅक्साईड ६० टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

- पुणे
महाराष्ट्रातील पुण्यात लॉकडाऊन आधीच्या तुलनेत पीएम १० चा स्तर ३२ टक्क्यांनी कमी, पीएम २.५ चा स्तर ३१ टक्क्यांनी, तर नायट्रोजन डायआॅक्साईड ३६ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

- अहमदाबाद
गुजरातमधील अहमदाबादेत लॉकडाऊन आधीच्या तुलनेत पीएम १० चा स्तर ४७ टक्क्यांनी कमी, पीएम २.५ चा स्तर ५७ टक्क्यांनी, तर नायट्रोजन डायआॅक्साईड ३२ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

स्रोत - शासनाची ‘सफर डॉट ट्रॉपमेट डॉट रेस डॉट इन’ वेबसाईट (ढोबळमानाने दोन प्रकारचे धूलिकण हवेत असतात. श्वसनामार्फत शरीरात जाणारे २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान असे पीएम २.५ कण आणि श्वसनातून शरीरात न जाणारे १० मायक्रोमीटरपेक्षा लहान पीएम १० कण.)

उद्या वाचा - रस्त्यांवरील आणि हवेतीलही ‘ट्राफिक’ कमी होणार

Web Title: CoronaVirus: Free breathing in metro cities; Corona disaster turned into pollution control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.