जैवविविधता दिन विशेष : जैवविविधतेने नटलेले नंदनवन ‘बोरगड’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 12:01 PM2020-05-22T12:01:48+5:302020-05-22T12:03:43+5:30

राज्यातील पहिले संवर्धन राखीव वन : वन्यप्राणी, पक्षी, फुलपाखरे अन् वनस्पतींचे माहेरघर 

Biodiversity Day Special: Borgad, a paradise full of biodiversity SSS | जैवविविधता दिन विशेष : जैवविविधतेने नटलेले नंदनवन ‘बोरगड’ 

जैवविविधता दिन विशेष : जैवविविधतेने नटलेले नंदनवन ‘बोरगड’ 

googlenewsNext

अझहर शेख

नाशिक - पक्ष्यांच्या १०५ पेक्षा अधिक प्रजाती, ‘अ‍ॅनामल्स नवाब’सारख्या अनेक दुर्मीळ फुलपाखरे अन् पिंक स्ट्रीप लिलीसारख्या (गडांबी कांदा) शेकडो दुर्मीळ वनस्पती तसेच साळींदरपासून विविध वन्यप्राणी, सरपटणाऱ्या प्राण्यांचे माहेरघर असलेले बोरगड संवर्धन राखीव वन हे जैवविविधतेने नटलेले शहराच्या वेशीजवळील नंदनवनच आहे. नाशिकच्यापर्यावरणात अन् नैसर्गिक जैवविविधता टिकवून ठेवण्यात या वनाचा सिंहाचा वाटा आहे.

राज्यातील पहिले संवर्धन राखीव वनक्षेत्र म्हणून नावलौकिक मिळविणाऱ्या बोरगड वनात लॉकडाऊनच्या काळात निसर्गाच्या कुशीत अनेक प्राणी, पक्षी निर्धास्तपणे वास्तव्य करत आहेत. मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिलेल्या या वनात सर्वच प्रकारच्या माणसांची वर्दळ आता दीड ते दोन महिन्यांपासून थांबलेली दिसते. यामुळे येथील जैवविविधता अधिकच समृद्ध झालेली पाहावयास मिळते. ५ मार्च २००८ साली जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बोरगड येथील वनाला राज्यातील पहिले संवर्धन राखीव वनक्षेत्राचा दर्जा राज्य शासनाच्या वनमंत्रालयाने दिला. यानंतर वनविभागाने गांभीर्याने याकडे लक्ष पुरविण्यास सुरूवात केली. यासाठी ‘एनसीएसएन’चे संस्थापक अध्यक्ष निसर्गप्रेमी दिवंगत बिश्वरूप राहा यांनी मोठा लढा दिला होता. वनाला लागून असलेल्या तुंगलदरा, आशेवाडी, देहेरवाडी या गावांनाही आता या राखीव वनाचे महत्त्व पटले आहे. नाशिक पुर्व वनविभागाच्या अखत्यारितित येणाऱ्या या संवर्धन राखीव वनासाठी ८५ टक्के निधी खर्च करण्याची तयारी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी दर्शविली आहे.

बोरगडची जैवविविधता दृष्टिक्षेपात 

 पावसाळ्यात बोरगडचे सौंदर्य डोळ्यांची पारणे फेडणारे असते. गेल्या वर्षी फुलांमध्ये पिंक स्ट्रीप लिलीदेखील (गडांबी कांदा) या वनात फुलली होती. तसेच अनुसुची-१मधील संरक्षित पश्चिम घाटात आढळणाऱ्या कंदीलपुष्पकच्या तीन प्रजाती या वनात पहावयास मिळतात. जंगली मशरूमसारख्या वनस्पती विविध प्रकारची रानफुले हे बोरगडचे खास वैशिष्ट्य मानले जाते.

 घुबड, घार, मोर, लालबुड्या बुलबुल, बाबलर, जांभळा सुर्यपक्षी, गिधाड, शिक्रा, ससाणा, गरूड यांसारख्या स्थानिक व स्थलांतरीत पक्ष्यांच्या एकूण १०५ प्रजातींची नोंद येथे झाली आहे.

 बिबट्या, तरस, कोल्हा, रानससे, साळिंदर, उदमांजर, रानमांजर, रानडुकरे यांसारखे वन्यजीव बोरगडच्या राखीव वनात आढळतात. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये घोरपडसह नाग, घोणस, मण्यार, हरणटोळ, धामण यांसारख्या सर्पांचाही येथे वावर आहे. 

लॉकडाउनमुळे कृत्रिम वनवा टळला बोरगड राखीव वनात उन्हाळ्यात काही ठिकाणी वणवा पेटतो. त्यामुळे वणवा नियंत्रणासाठी ठोस प्रयत्न या वनात होणे गरजेचे आहे. सुदैवाने यावर्षी वनवा लागला नाही. लॉकडाउनमुळे कृत्रिम वनव्याचा धोका टळला. वनविभागाने गावांमधील लोकांशी सतत संपर्क ठेवून त्यांना लाकुडफाटा गोळ्या करण्यासाठी वनात जाण्यापासून परावृत्त करणे गरजेचे आहे. शेतीतील फळझाडांना होणारी फळधारणा व परागीभवनाची क्रिया जंगलातील विविध किटकांमुळे होते तसेच विविध पक्षी शेतीसाठी नैसर्गिक किटकनाशकाची भुमिका बजावतात हे त्यांना पटवून देण्याची गरज असून यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता आहे. 

आजुबाजुच्या गावांमधील लोक आता उन्हाळ्यातही शेती करू लागले. कारण भुजलपातळी वाढण्यास या राखीव वनामुळे मदत झाली. पश्चिम घाटातील प्राणी, पक्षी वनस्पती या ठिकाणी आढळतात. पश्चिम घाटातील जैवविविधतेचे हे एक परिचयकेंद्रच आहे. नाशिक जिल्ह्याच्या पर्यावरणात आणि नैसर्गिक जैवविविधतेत बोरगड राखीव संवर्धन वनाचा सिंहाचा वाटा आहे.

- प्रतीक्षा कोठुळे, पर्यावरण अभ्यासक

Web Title: Biodiversity Day Special: Borgad, a paradise full of biodiversity SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.