मराठी नाटक समूहाचा आपुलकीच्या कार्याचा अखंड वसा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 12:22 AM2020-10-11T00:22:42+5:302020-10-11T00:22:55+5:30

संडे अँकर । देशविदेशातून मिळाला मदतीचा हात

The unbroken fat of the work of belonging to the Marathi drama group ...! | मराठी नाटक समूहाचा आपुलकीच्या कार्याचा अखंड वसा...!

मराठी नाटक समूहाचा आपुलकीच्या कार्याचा अखंड वसा...!

googlenewsNext

राज चिंचणकर 

मुंबई : मुंबई : मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने नाट्यव्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आणि आता आॅक्टोबर महिना उजाडला तरी अजून नाट्यगृहांवरचा पडदा उघडलेला नाही. मात्र या काळात आघाडीच्या रंगकर्मींचा चमू असलेल्या मराठी नाटक समूहाने, नाट्य व्यवसायावर उपजीविका असलेल्या पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात देण्याचा घेतलेला, आपुलकीच्या कार्याचा वसा अखंड सुरू ठेवला आहे.

प्रशांत दामले, पुरुषोत्तम बेर्डे, शेखर ताम्हाणे, हेमंत भालेकर, राजीव जोशी, शीतल तळपदे, आशीर्वाद मराठे, श्रीनिवास नार्वेकर या व अशा आघाडीच्या अनेक रंगकर्मींच्या मराठी नाटक समूहाने ‘एक हात आपुलकीचा, विश्वासाचा, आपल्या माणसांना सावरण्याचा’ या उपक्रमाअंतर्गत पडद्यामागील कलावंतांना मदत देण्याचा संकल्प केला आणि तो तडीसही नेला. या मदतनिधीसाठी समूहाने विविध स्तरांवर आवाहन केले आणि आणि समूहाच्या विश्वासार्हतेवर रसिकजन व रंगकर्मींनी देश-विदेशातून मदतीचा हात पुढे करत शिक्कामोर्तब केले. वास्तविक, लॉकडाऊनमुळे दोन-तीन महिने हे कार्य करावे लागेल असे या मंडळींना वाटले होते; परंतु कोरोनाने मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरले आणि लॉकडाऊनही वाढत गेला. परिणामी, नाट्य व्यवसाय अनिश्चित काळासाठी बंद झाला. मात्र मराठी नाटक समूह त्याच्या हेतूपासून मागे हटला नाही आणि समूहाने अंगीकारलेल्या सामाजिक बांधिलकीत कुठेही खंड पडला नाही.
मे महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत मराठी नाटक समूहाने निधी संकलनाच्या माध्यमातून तब्बल चाळीस लाखांची मदत पडद्यामागील कलावंतांना केली आहे. नाट्य व्यवसाय पूर्ववत सुरू होईपर्यंत नाट्य व्यवसायातील या घटकाला सावरण्याचा या समूहाचा प्रयत्न आहे.

प्रत्येकी अडीच हजार ही काही भरघोस मदत नाही; परंतु सध्याच्या अडचणीच्या काळात या कलाकारांच्या किमान गरजा भागवण्याच्या दृष्टीने ही रक्कम नक्कीच महत्त्वाची आहे. दर महिन्याला अशा गरजू व्यक्तींचे मदत मिळण्याबाबत संदेश येतात, तेव्हा तर आम्हाला हे प्रकर्षाने जाणवते.- आशीर्वाद मराठे (रंगकर्मी, मराठी नाटक समूह).

Web Title: The unbroken fat of the work of belonging to the Marathi drama group ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.